वृत्तसंस्था / दुबई
येथे सुरू असलेल्या एसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या पुरुषांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. या सामन्याला सकाळी 10.15 वाजता प्रारंभ होईल.
या अंतिम सामन्यात भारताची भक्कम फलंदाजी आणि बांगलादेशची अचूक गोलंदाजी यांच्यात चुरस पहावयास मिळेल. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत भारताचा 19 वर्षांखालील वयोगटाचा संघ इतर संघांच्या तुलनेत सर्वात यशस्वी म्हणून ओळखला जातो. भारताने आतापर्यंत ही स्पर्धा आठवेळा जिंकली आहे. आता भारतीय संघ तीन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा ही स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. बांगलादेशचा संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. यापूर्वी झालेल्या स्पर्धेत बांगलादेशने भारताचा पराभव करुन जेतेपद पटकाविले होते. बांगलादेशचा संघ पुन्हा यावेळी स्वत:कडे जेतेपद राखण्यासाठी प्रयत्न करेल. 2023 च्या स्पर्धेतील उपांत्य फेरीची पुनरावृत्ती या सामन्यात होत आहे.
भारतीय संघाची फलंदाजी आतापर्यंतच्या या स्पर्धेत समाधानकारक झाली असून सलामीचा फलंदाज आयुष म्हात्रे आणि वैभव सुर्यवंशी यांची फलंदाजी चांगलीच बहरत असल्याचे दिसून येते. म्हात्रेने या स्पर्धेत आतापर्यंत 175 धावा जमविल्या असून 13 वर्षीय वैभव सुर्यवंशीने 167 धावा जमविल्या आहेत. भारतीय फलंदाजांना बांगलादेशच्या गोलंदाजासमोर सावध रहावे लागेल. बांगलादेशच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने मोहम्मद अल फहाद आणि मोहम्मद इक्बाल हासन इमोन यांच्यावर राहिल. या स्पर्धेत भारतीय युवा संघाला सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर भारतीय संघाने पिछाडीवरुन मुसंडी मारत अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य सामन्यात भारताने लंकेचा पराभव केला तर बांगलादेशने पाकिस्तानला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळविले. बांगलादेशला या स्पर्धेत लंकेविरुद्धच्या एकमेव सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.









