येथे सुरू असलेल्या महिलांच्या इमर्जिंग आशिया चषक 23 वर्षाखालील वयोगटाच्या क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम लढत बुधवारी खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेतील भारत आणि लंका यांच्यातील मंगळवारचा उपांत्य सामना पावसामुळे पूर्ण वाया गेल्याने आता भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम लढत होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा उपांत्य फेरीचा सामना सोमवारी आयोजित केला होता पण वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे हा सामना एक दिवसाने म्हणजे मंगळवारी खेळण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान मंगळवारीही पावसाने विश्रांती घेतली नाही. या स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत केवळ एक सामना खेळत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. भारतीय महिला संघाने सलामीच्या सामन्यात यजमान हाँगकाँगचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला होता. त्यानंतर भारताचे पुढील तीन सामने पावसामुळे वाया गेले. दरम्यान बांगलादेशने या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.









