नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि बांगला देश यांच्यातील सामरिक सहकार्य दक्षिण आशिया भागाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रशंसोद्गार बांगला देशच्या वायुदलाचे अध्यक्ष एअर मार्शल शेख अब्दुल हन्नान यांनी काढले असून त्यांनी हे सहकार्य अधिक दृढमूल बनविण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. ते सध्या भारताच्या दौऱयावर आहेत. वायुदलाच्या प्रशिक्षणाथीँच्या संयुक्त पदवीदान संचलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
भारत आणि बांगला देश यांच्यातील सहकार्यावर जगाच्या या भागातील सुरक्षितता अवलंबून आहे. दोन्ही देशांचे पूर्वापार संबंध असून ते अधिक दृढमूल करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. दक्षिण आशियाची सुरक्षा आणि विकास यांमध्ये दोन्ही देशांना महत्वाची भूमिका घ्यायची आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी एकमेकांशी उत्कट सहकार्य करुन आपले उत्तरदायित्व निभावले पाहिजे. बांगला देशच्या वायुदलाचा प्रारंभ भारताच्या दिमापूर येथे 28 सप्टेंबर 1971 या दिवशी झाला होता. अशा प्रकारे दोन्ही देशांची एकमेकांशी नाळ जुळलेली आहे. दोन्ही देशांच्या यामुळे एकमेकांसंबंधी अतीव आदर आणि विश्वास आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वायुदलाच्या प्रशिक्षणार्थींनीही हे तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि स्वतःचा तसेच आपण काम करत असलेल्या संस्थेचा विकास घडवून आणणे आवश्यक आहे. वायुदलाची भूमिका संरक्षण आणि स्थिरता या दोन्ही दृष्टींनी महत्वाची असते, याची जाणीव नव्या प्रशिक्षणार्थींना असावी. सध्या आणि भविष्यकाळातही जगाला अनेक आव्हांनाना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल. आपण साऱयांनी ही आव्हान स्वीकारायचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.









