वृत्तसंस्था/ मुंबई
येथील वानखेडे स्टेडियमवर यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील एकमेव कसोटी सामन्याला येत्या गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. हा कसोटी सामना चार दिवसांचा राहिल. भारतीय महिला संघाने अलिकडेच इंग्लंडचा एकमेव कसोटी सामन्यात दणदणीत पराभव केल्याने ऑस्ट्रेलियन महिला संघ अधिक जागरुक असल्याचे उपकर्णधार ताहिला मॅकग्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला या एकमेव कसोटीपासून प्रारंभ होत आहे. सदर कसोटी सामना 21 ते 24 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या कसोटी सामन्यानंतर उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियन महिला संघाला सरावासाठी वानखेडे स्टेडियमवर एक सरावाचा सामना गेल्या रविवारी आयोजित केला होता. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीची कल्पना ऑस्ट्रेलियन संघाला येण्यासाठी तसेच मुंबईतील वातावरणाशी समरस होण्याकरीता तीन टप्प्यांमध्ये सराव सत्रे आयोजित केली होती.
भारतीय महिला क्रिकेट संघाने अलिकडेच बलाढ्या इंग्लंडचा विक्रमी धावांनी पराभव केला. या सामन्यातून ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना बरेच काही शिकता येईल. तसेच गुरुवारपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी डावपेचाचे नियोजन करणे ही खरी कसरत राहिल, असे संघाची उपकर्णधार मॅकग्राने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांमध्ये दर्जेदार गोलंदाज उपलब्ध आहेत. एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला पहिल्या डावात 136 तर दुसऱ्या डावात 131 धावात उखडले होते. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व अॅलिसा हिलीकडे सोपविण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन संघामध्ये दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. पण भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांना प्रभावी कामगिरी करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑस्ट्रेलियन फलंदाजीची या सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर सत्वपरीक्षा राहिल, असेही मॅकग्राने म्हटले आहे.









