संथ गतीबद्दल मोठा दंड, गिललाही पंचांच्या निर्णयावर टीका करणे भोवले
वृत्तसंस्था/ लंडन
भारतीय फलंदाज शुभमन गिलला जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याला बाद ठरविणाऱ्या पंचांच्या निर्णयावर टीका केल्याबद्दल शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि भारताला सामन्यादरम्यान षटकांची गती संथ राखल्याबद्दल मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
रविवारी ओव्हलवर झालेल्या सदर महत्त्वपूर्ण सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्याच्या समाप्तीनंतर भारत संथ षटकंच्या गतीबद्दल त्यांची सर्व मॅच फी गमावेल आणि त्याच कारणासाठी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मॅच फीच्या 80 टक्के दंड भरावा लागेल, हे स्पष्ट झाले. भारताला निर्धारित लक्ष्यापेक्षा पाच षटके कमी टाकली, तर ऑस्ट्रेलियाने चार षटके कमी टाकली असल्याचे आढळले. ‘आयसीसी’ आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार संघाला निर्धारित वेळेत टाकता न आलेल्या प्रत्येक षटकाच्या मागे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो.
आयसीसीने सांगितल्यानुसार, गिलला आयसीसीच्या आचारसंहितेच्या ‘लेव्हल-वन’चे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. गिलने आचारसंहितेच्या कलम 2.7 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यात घडलेल्या घटनेच्या संदर्भात सार्वजनिक टीका किंवा अयोग्य टिप्पणीशी संबंधित आहे. याव्यतिरिक्त गिलच्या शिस्तभंगविषयक नोंदीमध्ये एक डिमेरिट गुण जोडला गेला आहे. गिलचा 24 महिन्यांच्या कालावधीतील हा पहिला गुन्हा होता. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर गिलने सोशल मीडियावर जाऊन सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याला बाद ठरविण्याच्या पंचांच्या निर्णयावर टीका केली होती. गिलने घातलेले निर्बंध स्वीकारले आहेत, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही, असे आयसीसीने म्हटले आहे.









