दोन ‘मिचेल्स’ना रोखण्यावर भारताचा भर, सूर्याच्या कामगिरीवरही लक्ष
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा व शेवटचा सामना आज बुधवारी येथे होत असून दोन ‘मिचेल्स’ना आवर घालणे हा या सामन्यातील भारताचा मुख्य अजेंडा असेल. मिचेल स्टार्कच्या घातक स्विंग गोलंदाजीचा समर्थपणे मुकाबला करणे हे भारतीय फलंदाजांचे तर मिचेल मार्शच्या फटकेबाजीला रोखणे हे भारतीय गोलंदाजांचे मुख्य लक्ष्य असेल. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने या सामन्याला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे. दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल आणि त्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनींवरून केले जाईल.
दुसऱया सामन्यात स्टार्कच्या भेदक स्विंग गोलंदाजीपुढे भारताचा 117 धावांत धुव्वा उडाला होता तर मिचेल मार्शने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवित दोन सामन्यात तब्बल 11 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे या दोघांना रोखण्यावर भारताचा या सामन्यात जास्त भर असेल. मालिका जिंकण्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल व सूर्यकुमार यादव या भारतीय चौकडीला स्टार्कला रोखण्यासाठी आपला खेळ उंचवावा लागेल. यासाठी त्यांना तंत्रामध्ये बदल करण्याची तसेच मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे. स्टार्कने त्यांचे तंत्र पूर्णतः उघडे पाडले असल्याने तो पुन्हा एकदा स्विंग गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची सत्त्वपरीक्षा घेण्यास सज्ज झाला आहे.

भारतामध्ये व्हाईटबॉल क्रिकेटसाठी बहुतेक ठिकाणी फ्लॅट खेळपट्टय़ा बनविल्या जातात. त्यामुळे फलंदाजांना पदलालित्याचा फारसा वापर न करता चेंडूच्या रेषेत येऊन फटके मारणे पुरेसे ठरते. प्रंटफूटवर येत काहीवेळा आडवे फटके मारल्यास बऱयापैकी यश मिळते. कौशल्याने गोलंदाजी करणाऱया स्टार्कचे चेंडू ऑफ व मिडलस्टंपच्या रोखाने सरळ जातात किंवा हवेत वळण घेत टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग-मिडलस्टंपकडे आत येतो. स्टार्क ही करामत दीर्घकाळापासून करीत आला असल्याची जाणीव भारतीयांना आहे. पण मुंबई व विशाखापट्टणम येथील वातावरण त्याच्यासाठी पोषक ठरणारे आहे, याकडे त्यांनी फारसे लक्षच दिले नाही. मुंबईत खेळपट्टीकडून त्याला मदत मिळाली तर समुद्रकिनारी असणाऱया विशाखापट्टणम येथे खेळपट्टीपेक्षा हवेतच चेंडूने बरीच करामत केली.

चेन्नईच्या चेपॉकचे नूतनीकरण करण्यात आले असून पुन्हा तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर दीर्घकाळानंतर सामना होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. सर्वसाधारणपणे चेपॉकची खेळपट्टी मंद गोलंदाजांसाठी अनुकूल ठरणारी असते. त्यामुळे मधल्या षटकांत धावा जमविणे कठीण जाऊ शकते. पण चेन्नई सुपरकिंग्सची बलस्थाने लक्षात घेऊन खेळपट्टी बनवण्यात आली असल्याने सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना ती अनुकूल ठरणारी असेल, अशी शक्यता आहे.

सूर्याकडे लक्ष
टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव ऍक्रॉस येऊन फटकेबाजी करतो आणि त्यात तो बऱयापैकी यशस्वीही झाला आहे. पण त्याची ही स्टाईल वनडेमध्ये फारशी यशस्वी ठरलेली नाही. पहिल्या दोन्ही सामन्यात तो असे फटके मारताना पहिल्याच चेंडूवर पायचीत बाद झाला आहे. स्विंग व सीम गोलंदाजी खेळण्यासाठी फलंदाजाने परिपूर्ण समतोल राखण्याची आणि शक्य तितक्या उशिराने चेंडू खेळण्याची गरज आहे. सूर्या टी-20 मध्ये नेहमी चेंडू लेट खेळण्याचा प्रयत्न करतो. मात्र तोच प्रकार वनडेमध्ये करण्यात तो अपयशी ठरला आहे. श्रेयस अय्यर नसल्याने सूर्याला ही संधी मिळाली आहे. वर्ल्ड कपमधील स्थान निश्चित करण्यासाठी त्याने या संधीचा उपयोग करून घ्यायला हवा. मात्र आतापर्यंत तरी तो यात यशस्वी झालेला नाही.
भारतीय गोलंदाजांचे वर्कलोड मॅनेजमेंट गांभीर्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे. पण तसे पाहिल्यास भारतीय गोलंदाजांना फारसे काम लागलेले नाही. दोन सामन्यांत त्यांनी एकूण 47 (36 व 11) षटके गोलंदाजी केली आहे. म्हणजे 100 षटकाच्या निम्म्याहून कमीच षटके त्यांनी टाकली आहेत. चेन्नईत प्रथम गोलंदाजी करण्यास शमी व सिराज यांना निश्चितच आवडेल. तिसरा स्पेशालिस्ट सीमर म्हणून शार्दुल ठाकुरला की डावखुऱया उनादकटला की दोन्ही स्पिनर्सना स्थान द्यायचे, हा प्रश्न आहे. तसे झाल्यास कुलदीप यादव व अक्षर पटेल यांना जडेजासमवेत पुन्हा एकदा संधी मिळू शकते.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), गिल, कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंडय़ा, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शमी, सिराज, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, जयदेव उनादकट, चहल, उमरान मलिक.
ऑस्ट्रेलिया ः स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्श, हेड, स्टोईनिस, मॅक्सवेल, लाबुशेन, ग्रीन, नाथन एलिस, स्टार्क, सीन ऍबट, झाम्पा, ऍश्टन ऍगर, वॉर्नर, कॅरे, जोस इंग्लिस.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.









