येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू होणार पाच सामन्यांची मालिका
वृत्तसंस्था/ मेलबर्न
या वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यातील पहिली कसोटी पर्थवर आयोजित करण्यात येणार आहे. या मालिकेत एकूण पाच कसोटी खेळविल्या जाणार आहेत.
सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये आलेल्या वृत्तानुसार, या ब्लॉकबस्टर मालिकेतील सामने खेळण्यासाठी अॅडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न व सिडनी या केंद्रांची निवड करण्यात आली आहे. ‘अॅडलेडमध्ये दुसरी तर ब्रिस्बेनमध्ये तिसरी कसोटी खेळविली जाईल. बॉक्सिंग डे आणि नववर्षातील कसोटी परंपरेप्रमाणे मेलबर्न व सिडनी येथे खेळविल्या जातील,’ असे या वृत्तात म्हटले आहे. अॅडलेडमध्ये होणारी कसोटी डे-नाईट कसोटी असेल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढील मोसमाचा अद्याप कार्यक्रम जाहीर केलेला नाही. याबाबत अंतिम घोषणा या महिन्यात अखेरपर्यंत होण्याची अपेक्षा आहे. ही मालिका नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणार आहे. 1991-92 नंतर ऑस्ट्रेलियात भारतीय संघ प्रथमच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 91-92 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर 4-0 अशी मात केली होती.
या दोन संघांत झालेल्या मागील चार मालिका भारतानेच जिंकल्या आहेत. त्यात 2018-19 व 2020-21 या लागोपाठच्या दोन मालिकांचा समावेश आहे. 2018-19 मधील मालिकेत पर्थमध्ये दुसरी कसोटी खेळविण्यात आली होती, ती कसोटी ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी जिंकली होती. 2020-21 मधील मालिकेत पर्थला कसोटी आयोजनाची संधी देण्यात आली नव्हती. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.