नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा : शांतता प्रस्थापित करण्यास समर्थन
वृत्तसंस्था/काठमांडू
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी चर्चा केली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांकरता भारताच्या दृढ समर्थनाची पुष्टी दिली आहे. नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्यासोबत सार्थक चर्चा झाली. तसेच अलिकडेच झालेल्या दु:खद जीवितहानीबद्दल संवेदना व्यक्त केल्या. याचबरोबर कार्की आणि नेपाळच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी एक्सवर ट्विट करत दिली.
ही चर्चा 8 सप्टेंबर रोजी हिंसक झटापटी आणि निदर्शनांमुळे संसद विसर्जित झाल्यावर सुशीला कार्की यांनी नेपाळमध्ये अंतरिम पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारल्याच्या काही दिवसांनी झाली आहे. या निदर्शनांचे नेतृत्व मुख्य स्वरुपात जनरेशन झेड युवा कार्यकर्त्यांनी केले होते. भ्रष्टाचार, उत्तरदायित्वाचा अभाव आणि राजकीय अभिजातवर्गाच्या कथित अपयशावरून वाढलेल्या नाराजीतून ही निदर्शने झाली होती. नेपाळच्या तत्कालीन सरकारकडून सोशल मीडियावर बंदी घालण्यात आल्यावर लोक रस्त्यांवर उतरले होते.
स्थिती बदलली
नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आणि आता पहिल्या महिला पंतप्रधान कार्की यांना जनरेशन झेडच्या नेतृत्वाखालील आंदोलकांचे समर्थनप्राप्त आहे. या आंदोलनामुळे देशातील राजकीय चित्रच बदलून गेले आहे. कार्की या 5 मार्च 2026 पर्यंत पंतप्रधानपदावर राहणार आहेत, त्यानंतर या पदासाठी नव्याने निवडणूक होणार आहे. नव्या पंतप्रधानाची निवड संसदेकडून केली जाणार आहे. तर नेपाळमधील तणाव आता कमी झाला असून जनजीवन मूळ पदावर आले आहे.
केपी शर्मा ओली यांचा राजीनामा
हिंसक निदर्शनांदरम्यान केपी शर्मा ओली यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. तसेच आंदोलकांनी अनेक राजकीय नेत्यांना मारहाण केल्याने कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर दावा करण्याच्या स्थितीत नव्हता. या स्थितीत आंदोलकांनी 73 वर्षीय सुशील कार्की यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव मांडला होता. कार्की यांनी मागील आठवड्यात शुक्रवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.
भारतीय राजदूताने घेतली होती भेट
यापूर्वी मंगळवारी नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सिंह दरबार येथील सुशील कार्की यांच्या कार्यालयात जात शिष्टाचार भेट घेतली होती. राजदूत श्रीवास्तव यांनी पंतप्रधान म्हणून कार्की यांच्या नियुक्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शुभेच्छा संदेश पोहोचविला होता. दोन्ही शेजारी देशांदरम्यान मैत्री आणि सहकार्याच्या घनिष्ठ संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी भारताच्या प्रतिबद्धतेचीही राजदूत श्रीवास्तव यांनी पुष्टी दिली, असे नेपाळच्या विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.









