वृत्तसंस्था/लखनौ
यष्टीरक्षक आणि फलंदाज ध्रुव जुरेलच्या नाबाद शतकाच्या जोरावर पहिल्या अनधिकृत कसोटीतील खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाला चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 4 बाद 403 धावा जमविल्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया अ ने पहिला डाव 6 बाद 532 धावांवर घोषित केला होता. सॅम कोनस्टासचे शतक (109) आणि जोश फिलिपीच्या नाबाद शतकाच्या जोरावर (123) ऑस्ट्रेलिया अ ने आपला पहिला डाव 6 बाद 532 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर भारत अ संघाने 1 बाद 116 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला.
जगदीशनने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 113 चेंडूत 64 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया अ संघातील बार्टलेटने जगदीशनला झेलबाद केले. सुदर्शन आणि पडीकल यांनी 76 धावांची भागिदारी केली. गेल्या जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या तामिळनाडूच्या साई सुदर्शनने 73 धावांचे योगदान दिले. तो कोनोलीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. भारत अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर केवळ 8 धावांवर बाद झाला. देवदत्त पडीकल आणि ध्रुव जुरेल यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 181 धावांची भागिदारी केल्याने भारत अ संघाने दिवसअखेर पहिल्या डावात 4 बाद 403 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया अ प. डाव 6 बाद 532 डाव घोषित, भारत अ प. डाव 103 षटकात 4 बाद 403 (ध्रुव जुरेल खेळत आहे 113, पडीकल खेळत आहे 86, जगदीशन 64, साई सुदर्शन 73, श्रेयस अय्यर 8, स्कॉट, कोनोली, रोचीसिओली, बार्टलेट प्रत्येकी 1 बळी).









