वृत्तसंस्था / लंडन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिला प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहे. युरोपच्या टप्प्यात भारतीय महिला हॉकी संघाला यापूर्वी सलग दोन सामने गमवावे लागले आहेत. आता भारतीय महिला हॉकी संघाचे पाठोपाठ दोन सामने हॉकीच्या मानांकनात दुसऱ्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिनाबरोबर होणार आहेत. यापैकी पहिला सामना मंगळवारी येथे खेळविला जाईल.
सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाला प्रो लीग महिला हॉकी स्पर्धेतील युरोपियन टप्प्यात बलाढ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन सामने गमवावे लागले. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 2-1 तर दुसऱ्या सामन्यात 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने निसटता विजय मिळविला आहे. आता भारतीय महिला संघ गतपराभव विसरुन अर्जेंटिनाबरोबर दर्जेदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत अर्जेंटिनाने प्रो लीग हॉकी स्पर्धेत 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. हॉकीच्या मानांकनात अर्जेंटिना सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारताने 9 गुण नोंदवित सातवे स्थान गुणतक्त्यात घेतले आहे. तर अर्जेंटिना दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील दुसरा सामना बुधवारी खेळविला जाईल.









