एकाच देशाची दोन नावे असे सहसा जगभर कुठेही नाही. पण आपल्या देशाची भारत आणि इंडिया अशा दोन नावांनी ओळख आहे. भारत सरकार आणि इंडियन गव्हर्मेंट असे शब्द वर्षानुवर्षे प्रचलित आहेत. भारताची विश्वविजेती क्रिकेट टीम ही ‘टीम इंडिया’ अशी ओळख ठेऊन आहे आणि ही दोन्ही नावे संसदीय आहेत. या देशाची हिंदुस्थान, आर्यावर्त, जंबूदीप अशीही नावे होती व आहेत पण भारत व इंडिया ही दोनच नावे संविधानिक आहेत. अलीकडेच मोदी सरकार विरोधी विविध पक्षाच्या आघाडीने इंडिया आघाडी असे नाम धारण केले आणि इंडिया समिटच्या तीन बैठका झाल्या आणि इंडिया हा शब्द राजकीय बनला. ओघानेच आता देशाची ओळख भारत या शब्दानेच व्हावी अशी हालचाल सुरु झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रेसिडेंट ऑफ भारत असे स्वत:चे पद लावल्याने मोदी विरोधकांना जाग आली आहे. नावात काय आहे असे शेक्सपियरने म्हटले हेते पण नावात अनेक गोष्टी असतात. त्यातून अनेक अंदाज बांधले जाऊ शकतात. तत्कालिन सामाजिक गोष्टी अधोरेखित होत असतात. आपल्या देशाची अनेक नावे आहेत. पण तो भारत व इंडिया या नावाने ओळखला जातो. सोळाव्या शतकाअखेर हिंदुस्थान आणि भारत या नावानीच ओळख असलेला आपला देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात गेला आणि इंग्रजांनी भारत, हिंदुस्थान म्हणण्याऐवजी इंडिया म्हणायला सुरुवात केली. सरकारी दप्तरात तसे उल्लेख रुढ झाले आणि इंडिया नाव फोफावले. खरेतर देशाचे नाव हे तेथील सभ्यता, संस्कृती आणि परंपरा यांच्याशी जोडलेले असते. इंडिया या शब्दाशी पारतंत्र्याचे नाते आहे ते पुसले जावे असे अनेकांना वाटते. भारत हे नाव पुरातन आहे. भगवान ऋषभदेव यांचे पुत्र भरत हे चक्रवर्ती राजे होते. पराक्रमी, महावीर अशा या भारताच्या नावाने भारत या देशाचे नामकरण झाले. तुर्की आणि इराणी यांनी सिंधु नदीच्या खोऱ्यात प्रवेश केला. त्यांना सिंधुचा उच्चार सिंधु करता येईना. त्यांनी तो हिंदू केला आणि हिंदुस्थान असे नामकरण झाले. भारत स्वतंत्र झाला तेव्हा किंवा त्यापूर्वीपासून भारताचे शेजारी देश, भारताचा उल्लेख हिंदुस्थान करत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणही भारताचा उल्लेख हिंदुस्थान करत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हिंदुस्थान या नावासाठी आग्रह होता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण इंग्रजांनी माथी मारलेली इंडिया नावाची खूण स्वीकारुन वावरत होतो. पण आता इंडिया आणि भारत हे शब्द ऐरणीवर आले आहेत. या आठवड्याच्या अखेरीस जी-20 संघटनेची शिखर परिषद दिल्लीत होते आहे. भारत या परिषदेचा यजमान आहे. या परिषदेची जोरदार तयारी सुरु आहे. या परिषदेच्या निमित्ताने उपस्थित विविध राष्ट्रप्रमुख व मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मेजवानी देणार आहेत. या मेजवानीचे निमंत्रण श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वत:चा प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करुन दिले आहे. त्यामुळे सारे सजग झाले आहेत. पारतंत्र्याच्या खुणा पुसून टाकण्यात खरेतर कोणतीही अडचण नसावी. देश स्वतंत्र झाला तेव्हाच ही गोष्ट घडायला हवी होती. पण भारताच्या घटनेनेही ‘इंडिया दॅट इज भारत’ असे म्हटले आहे. ओघानेच 75 वर्षे इंडिया हा शब्द सुरु राहिला आहे. आक्रमणाच्या, पारतंत्र्याच्या खुणा पुसून टाकायचा कार्यक्रम मोदी सरकारने चालवलेला आहे, गावांची नावे, रस्त्यांची नावे, इमारतींची नावे बदलली जात आहेत त्यावरुन टिका-टिप्पणीही होते. नाव बदलले म्हणून बेरोजगारी नष्ट होणार आहे का, महागाई कमी होणार आहे का असे प्रश्न विचारले जातात. जातीयतेचे, धर्मांधतेचे आरोप केले जातात पण मोदी सरकार कशालाही न कचरता असे निर्णय घेताना दिसत आहे. आता तर मुळावर घाव या उक्तीप्रमाणे इंडिया या शब्दाला निरोप दिला जाणार असे दिसते आहे. मोदी सरकारने गणेश उत्सव काळात संसदेचे विशेष अधिवेशन नवीन संसद भवनात बोलावले आहे. त्यामागे निश्चितच काही धोरणे आहेत. समान नागरी कायदा, एकाचवेळी देशभराच्या सर्व निवडणुका आणि इंडियाला निरोप अशा चर्चा आहेत. इंडिया या शब्दाला देशी आत्मियता नाही. शेतकऱ्यांचे पंचप्राण स्वर्गीय शरद जोशी नेहमी भारत आणि इंडिया अशी तुलना करायचे आणि सरकारने या देशातले निर्णय घेताना येथील गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांचा विचार करुन घ्यावेत असे म्हणत असत. शरद जोशींच्या माघारी शेतकरी संघटनेच्या चार शेतकरी संघटना झाल्या आणि भारत हा विषयही थांबला पण आता शरद पवार, उद्धव ठाकरे, लालू यादव, ममता
बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल यांनी इंडिया असे आपल्या आघाडीचे नाव धारण केल्याने राजकारणात ट्वीस्ट आला आहे. काही लोक आपल्या मुलांचे नाव भारत ठेवतात. काही पद्मभूषण ठेवतात. ओघानेच त्यांच्या नावामागे पद्मभूषण लागते. हे पोकळ समाधान असते. त्यातून उभी राहणारी प्रतिमा फारशी उजळ नसते. पण जो तो गंमत करत असतो. नवीन संसद भवनात मोदींनी अनेक पारतंत्र्यांच्या खुणा पुसून टाकल्या आहेत. रस्त्याची नावे, बगिचाचे नाव इथंपासून बारीक-सारीक गोष्टींचे भान ठेवण्यात आले आहे. राजकारणातून त्याला विरोध होतो आहे व तो अपेक्षित आहे. राजकारण राजकारणाच्या जागेवर आणि देशाच्या गौरवाच्या, सामर्थ्यांच्या आणि वैभवाच्या गोष्टी देशासोबत असल्या पाहिजेत. आज जे सरकार आहे ते उद्या असेल, नसेल, सरकारे येतील, जातील पण देश, देशाची अस्मिता कायम राहणार आहे. ओघानेच असे देश अस्मितेचे निर्णय करावे लागतील हा निर्णय नेहरुंच्या काळातच व्हायला हवा होता. आता देशाच्या अमृत काळात नवीन संसदेत तो होणार असेल तर आनंद आहे जे देशाच्या, लोकांच्या हिताचे आहे ते केले पाहिजे. म्हणूनच ‘भारत’ या निर्णयाचे जनसामान्यातून स्वागत होते आहे. देशहिताचे, देशअस्मितेचे विषय हे त्याच फूटपट्टीने तपासले पाहिजेत. उगाच अशा विषयांना राजकारणाच्या व संकुचित स्वार्थाच्या फुटपट्टया लाऊ नयेत आणि रोज चिखलफेक सुरु असलेल्या राजकीय पक्षांना व त्यांच्या आघाड्यांना काय नाव द्यावे यांचेही संबंधितांसह सर्वानी भान बाळगावे. देशाच्या नावाचा कुणी संकुचित स्वार्थ साधू पाहत असेल तर त्याचीही दखल देशातील आम जनतेने घेतली पाहिजे.








