ब्रिटनच्या राजदुतांचे मोठे वक्तव्य ः ‘जी-20’चे अध्यक्षपद भूषवताना मोठी संधी असल्याचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतामध्ये जगातील अनेक मोठय़ा समस्या सोडविण्याची क्षमता आहे, असे ब्रिटनचे भारतातील राजदूत अलेक्झांडर एलिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘जी-20’चे अध्यक्षपद भूषवताना भारताला जगात चमक दाखविण्याची संधी चालून आलेली आहे. तसेच आधुनिक भारताची क्षमताही या माध्यमातून सिद्ध होईल, असे ते म्हणाले.
भारत हा एक शक्तिशाली देश असून त्याचे जगातील अनेक देशांशी सौहार्दपूर्ण आणि दृढ संबंध आहेत. या वैशिष्टय़ामुळे भारत जगात हवामान बदल, सार्वजनिक आरोग्य आदींसह अनेक समस्यांच्या निराकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असे एलिस म्हणाले. भौगोलिक स्थितीनुसार जगभर राजकारणात खूप स्पर्धा आहे. तसेच वेगळेपणाही आहे. मात्र, जगातील विविध देशांना एकत्र आणण्याची शक्ती भारताकडे आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भारत जी-20 देशांचे अध्यक्षपद भूषवत आहे. पंतप्रधान मोदींनी जी-20 साठी त्यांचा अजेंडा सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी आणि कृतीवर आधारित असल्याचे वर्णन केले आहे. जी-20 दरम्यान भारताचे मॉडेल इतर देशांसमोर, विशेषतः विकसनशील देशांसमोर ठेवता येईल यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20ची थीम ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ अशी ठेवण्यात आली आहे. हे बोधवाक्य प्राचीन संस्कृत वेद महा उपनिषदातून घेण्यात आले आहे. भारतातील जी-20 बैठक केवळ नवी दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांपुरती मर्यादित राहणार नाही. भारतातील जी-20 ची बैठक देशातील 50 शहरांमध्ये होणार आहे. याद्वारे जी-20 प्रतिनिधींना भारताची समृद्ध संस्कृती पाहायला मिळणार आहे.
सुरक्षा परिषदेतही भारताने बदल करावेत!
ब्रिटन भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थान देण्याच्या बाजूने असल्याचेही ब्रिटिश उच्चायुक्तांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल करणे अवघड असले तरी त्यावर आपल्याला काम करावे लागेल. सुरक्षा परिषदेत ठराविक अंतराने बदल होत आलेले आहेत. दुसऱया महायुद्धानंतर, जागतिक व्यापार संघटनेनंतर, जागतिकीकरणानंतर आणि 90 च्या दशकाच्या मध्यातही त्यात बदल झालेले असून आता भारताने त्यात प्रभावी बदल करावेत अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.









