महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराबाबत केलेल्या एका विधानामुळे आता एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंडिया ब्लॉक सत्तेवर आल्यानंतर आयोध्येमधील राम मंदिराचे शुद्धीकरण चार शंकराचार्यांकडून केले जाईल असे म्हटलं आहे.
यापुर्वीही काँग्रेस पक्षाने राम मंदिराच्या उद्घाटनावर आक्षेप घेऊन चार शंकराचार्यांच्या वक्तव्याचा आधार दिला आहे. राम मंदिराचे कामकाज अजूनही अपुर्ण असल्याने रामलल्लाची मुर्ती त्यामध्ये स्थापित करणे हे शास्त्राला धरून नसल्याचा दावा देशातील चार प्रमुख शंकराचार्यांनी केला होता.त्यांच्या या वक्तव्याने रामभक्तांमध्ये संभ्रमावस्ता निर्माण झाली होती. 22 जानेवारी रोजी झालेल्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला काँग्रेसने मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे सांगून गैरहजेरी लावली.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, राम मंदिराचे बांधकाम धर्मशास्त्रापद्धतीने झाले नाही. हे मी नाही म्हणत तर खुद्द शंकराचार्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉलच्या विरोधात काम केले असून इंडिया आघाडी यामध्ये दुरुस्ती करणार असल्याचं म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी मंदिरात राम दरबाराची स्थापना केली जाईल असेही म्हटले आहे. “आयोध्येमधील मुर्ती ही प्रभू रामाची मूर्ती नसून ती रामलल्लाचे बालस्वरूप आहे. नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या उभारणीत प्रोटोकॉलच्या विरोधात काम केले आहे. आम्ही ते सुधारणे आणि धर्माच्या माध्यमातून करू.”
शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तीक टिका करताना, “या बाबतीमध्ये चार शंकराचार्यांनी जे सांगितले विधी योग्य पद्धतीने पाळले गेले नाहीत. आम्ही सत्तेत आल्यावर शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणेच करू. सनातन धर्मात, जेव्हा आपल्या घरी कोणाचा तरी मृत्यु होतो तेव्हा आपले मुंडण केलं जातं पण नरेंद्र मोदींनी तसं केलं नाही,” असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.