INDIA आघाडीची तिसरी बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली असून या नविन विरोधी आघाडीने 13 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप विरुद्ध एकजुटीने आणि चुरशीची लढत देण्याचा ठराव केला.
आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी 14 सदस्यांसह एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली. केंद्रीय समन्वय आणि निवडणूक रणनीती समिती व्यतिरिक्त या आघाडीने 19 सदस्यीय प्रचार समिती आणि 11 सदस्यीय संशोधन गट देखील स्थापन केला आहे. तसेच जागावाटप हे राज्य पातळीवरच केले जाईल असाही निर्णय या बैठकीत झाला.
या वेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी हुकुमशाही आणि मित्रशाही विरोधात मोहीम उघडणार असल्याचे म्हटले आहे तसेच इंडीया आघाडीच्या बैठकीमुळे मोदी सरकार घाबरले असल्याचाही दावा केला.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी या बैठकीचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांचे आभार मानले. ब्रिटीश सरकार काँग्रेसमुक्त भारत करू शकले नाहीत उलट काँग्रेसनेच त्यांना देशाबाहेर हाकलले. पण मोदीजींना वाटते की अदानीसोबत ते काँग्रेसमुक्त भारत करू हे कधीच शक्य नाही. अदानीचा पैसा काँग्रेसला पुसून टाकू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी नरेंद्र मोदी गरिबांविरोधात काम करत आहे, ते उद्योगपतींचे मित्र असून गरिबांचा पैसा उद्योगपतींकडे वळवत आहेत. त्यांनी संविधानात्मक संस्थांचा गैरवापर केला असून यापुर्वी अशा घटना कधीच घडल्या नसल्याचेही सांगितले आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटे पण रेटून बोलतात. ते कितीही प्रयत्न करू देत पण आम्ही त्यांना घाबरणार नाही असे म्हटले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देशाचा इतिहास बदलण्याचे षडयंत्र सुरु असून आम्ही असे होऊ देणार नाही. संपुर्ण देश एकजूट होणे गरजेचे प्रत्येकाचा विकास झालाच पाहीजे. भाजपचे काम कमी आणि गवगवा जास्त आहे असेही त्यांनी बोलून दाखवले.
आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविेद केजरीवाल यांनी ही फक्त विविध पार्टींची आघाडी नसून ती देशातील 140 कोटी देशांची आहे. देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होत असून भाजपचे नेते स्वत:ला देवापेक्षाही मोठे समजायला लागले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी देशात परिस्थिती चांगली नसून गरिबी वाढत आहे. महिला आणि अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. देशात भाववाढ आहे. देशात असा कोठला नेता नाही ज्याला इडीने फसवले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवणारच. असे म्हणून राहूल गांधींना आम्ही विश्वास देतो कि आम्ही इंडिया आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे असल्याचे म्हटले आहे.








