वृत्तसंस्था/ ताश्कंद (उझबेकिस्तान)
येथे सुरु असलेल्या 2023 च्या पुरुषांच्या विश्व मुष्ठीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या दीपक कुमार, मोहम्मद हुसामुद्दीन, निशांत देव या तीन स्पर्धकांनी आपल्या वजन गटातून उपांत्यफेरी गाठली आहे. आता या स्पर्धेत हे मुष्ठीयौद्धे आता भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेमध्ये भारताची तीन पदके निश्चित झाली आहेत.
या प्रतिष्ठेच्या जागतिक मुष्ठीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पदक तक्त्यात भारत सध्या संयुक्त चौथ्या स्थानावर आहे. यजमान उझवेकिस्तान 9 पदकांसह पहिल्या, क्युबा आणि रशिया प्रत्येकी 6 पदकांसह दुसऱ्या तर कझाकस्तान 5 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 2019 च्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळविणारा दीपक कुमार याची उपांत्य फेरीतील लढत फ्रान्सच्या बिलाल बेनेमाशी होणार आहे. बेनेमाने आतापर्यंत दोन वेळा विश्व मुष्ठीयुद्ध स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे. 26 वर्षीय दीपक कुमारने आतापर्यंत दोन वेळा या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे. ताश्कंदमधील स्पर्धेत दीपक कुमारने आपल्या वजन गटातील पहिल्या तीन लढती एकतर्फी जिंकल्या आहेत. तसेच त्याने टोकीयो ऑलिंपिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या कझाकस्तानच्या बिबोसिनोव्हचा पराभव केला आहे. दीपक कुमारने 51 किलो गटात अंतिम फेरी गाठली तर त्याची सुवर्णपदकासाठी लढत रिओ ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता हेसनबॉय डुसमेटोव्ह किंवा विद्यमान युरोपियन चॅम्पियन स्पेनचा मार्टिन मोलिनाशी होण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेला भारताचा मुष्ठीयोद्धा मोहम्मद हुसामुद्दीनने 57 किला वजन गटात आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली असल्याने तो अंतिम फेरीत प्रवेश मिळवेल असे वाटते. त्याचा उपांत्य फेरीतील सामना क्युबाच्या सेडल होर्टाशी होणार आहे. दोन वेळेला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या हुसामुद्दीनने आतापर्यंत ताश्कंदच्या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. तेलंगणाच्या हुसामुद्दीनचा उपांत्य फेरीचा सामना उझवेकचा खेलोकोव्ह किंवा किर्जीस्तानच्या युलू यांच्याशी होणार आहे.
पुरुषांच्या 71 किलो वजन गटात भारताच्या निशांत देवने उपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकून भारताचे किमान एक पदक निश्चित केले आहे. त्याचा उपांत्य फेरीचा सामना विद्यमान आशियाई विजेता शिमबेरगेनोव्हशी होणार आहे. ताश्कंदमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत विविध 107 देशांचे सुमारे 538 स्पर्धत सहभागी झाले असून त्यामध्ये अनेक ऑलिंपिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. सुवर्णपदक विजेत्याला 2 लाख डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 1 लाख डॉलर्स तर कांस्यपदक मिळविणाऱ्या दोन स्पर्धकांना प्रत्येकी 50 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे.









