वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हरदीपसिंग निज्जर या खलिस्तानवादी दहशतवाद्याच्या हत्येसंबंधी कॅनडाने अद्यापही कोणताही पुरावा सादर केलेला नाही, असे प्रतिपादन केंद्र सरकारने केले आहे. निज्जर हत्या प्रकरण भारताने गांभीर्याने घ्यावे, अशी सूचना करणारे पत्र नुकतेच अमेरिकेच्या प्रशासनाने भारताला पाठविले आहे. त्यासंदर्भात भारताने आपली बाजू स्पष्ट केली असून या प्रकरणात कॅनडाने कोणताही पुरावा सादर केलेला नाही, असे अमेरिकेला कळविले आहे. निज्जर हत्या प्रकरणात भारताचा कोणताही हात नाही, ही बाब भारताने यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे.
अमेरिकेचा नागरिक असणारा गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचण्याच्या संदर्भात भारताने उच्चस्तरीय अन्वेषण कक्ष स्थापन केला आहे. अमेरिकेने या कटाच्या संदर्भात भारताला माहिती दिली होती. एका भारतीय नागरिकाला या संदर्भात अटक करण्यात आली असून तो अमेरिकेच्या कारागृहात आहे. अमेरिकेच्या न्यायालयात सध्या या प्रकरणी अभियोग हाताळला जात आहे.









