शेफाली, बिस्त यांची उपयुक्त खेळी, प्रेस्टवीजचे 3 बळी
वृत्तसंस्था/ब्रिसबेन
भारत अ महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या एकमेव अनधिकृत कसोटी सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आल्याने केवळ 23.2 षटकांचा खेळ झाला आणि भारत अ महिला क्रिकेट संघाची पहिल्या डावात स्थिती 5 बाद 93 अशी केविलवाणी झाली. एकमेव कसोटी चार दिवसांची खेळविली जात आहे. गुरुवारी या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने नाणेफेक जिंकून भारत अ महिला संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. डावातील दुसऱ्या षटकात सलामीची फलंदाज नंदिनी काश्यप प्रेस्टवीजच्या गोलंदाजीवर आपले खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचीत झाली.
त्यानंतर प्रेस्टवीजने आपल्या याच षटकातील शेवटच्या चेंडूवर धारा गुर्जरला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. सलामीची शेफाली वर्मा आणि तेजल हसबनीस यांनी तिसऱ्या गड्यासाठी 38 धावांची भर घातली. जिंजरने हसबनीसला मिल्सकरवी झेलबाद केले. तिने 2 चौकारांसह 9 धावा जमविल्या. भारत अ महिला संघाची स्थिती यावेळी 10 षटकात 3 बाद 44 अशी होती. प्रेस्टवीजने भारत अ महिला संघाला आणखी एक धक्का देताना सलामीच्या शेफाली वर्माचा त्रिफळा उडविला. तिने 38 चेंडूत 8 चौकारांसह 35 धावा जमविल्या. ब्राऊनने तनुश्री सरकारला झेलबाद केले. तिने 2 चौकारांसह 13 धावा जमविताना बिस्तसमवेत पाचव्या गड्यासाठी 28 धावांची भर घातली. 23.2 षटकाअखेर भारत अ महिला संघाने 5 बाद 93 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : भारत अ महिला संघ प. डाव 23.2 षटकात 5 बाद 93 (शेफाली वर्मा 35, राघवी बिस्त खेळत आहे 26, सरकार 13, प्रेस्टवीज 3-25, ब्राऊन 1-41, जिंजर 1-19)









