शेफाली वर्मा, राघवी बिस्त यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
येथे सुरू असलेल्या एकमेव अनाधिकृत कसोटी सामन्यातील शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसांअखेर भारत अ महिला संघाने ऑस्ट्रेलिया अ महिला संघावर 254 धावांची आघाडी मिळविली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने पहिल्या डावात 305 धावा जमवित केवळ सहा धावांची बढत मिळविली. सायना जिंजीरने शानदार शतक झळकविले. भारत अ महिला संघाच्या दुसऱ्या डावात शेफाली वर्मा आणि राघवी बिस्त यांनी अर्धशतके नोंदविली.
या सामन्यात भारत अ महिला संघाचा पहिला डाव 299 धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने 5 बाद 158 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांच्या शेवटच्या पाच गड्यांनी 147 धावांची भर घातली. ऑस्ट्रेलिया अ संघातील फलंदाज जिंजीरने 138 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 103 तर फेल्टुमने 91 चेंडूत 6 चौकारासह 54, ब्राऊनने 3 चौकारांसह 22, कर्णधार विल्सनने 7 चौकारांसह 49 धावा जमविल्या. जिंजीरने आपले शतक 134 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह पूर्ण केले. 76.2 षटकात ऑस्ट्रेलिया अ संघाचा 305 धावांवर आटोपला. भारत अ महिला संघातर्फे सईमा ठाकुरने 3 तर राधा यादव आणि मिनु मणी यांनी प्रत्येकी 2 तसेच साधू, जोशिता आणि सरकार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
भारत अ महिला संघाने दुसऱ्या डावाला सावध सुरूवात केली. सलामीच्या शेफाली वर्मा आणि काश्यप यांनी 42 धावांची भागिदारी केली. काश्यपने 12 धावा जमविल्या. गुज्जरने 3 चौकारांसह 20 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि हसबनीस यांनी तिसऱ्या गड्यासाठी 37 धावांची भर घातली. शेफालीने 58 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 52 धावांचे योगदान दिले. हसबनीसने 52 चेंडूत 7 चौकारांसह 39 धावा केल्या. राघवी बिस्त आणि सरकार या जोडीने पाचव्या गड्यासाठी 68 धावांची भागिदारी केली. सरकारने 4 चौकारांसह 25 धावा केल्या. राघवीने 119 चेंडूत 13 चौकारांसह 86 धावांचे योगदान दिले. कर्णधार राधा यादव 2 चौकारांसह 10 धावांवर बाद झाली. दिवसअखेर भारत अ महिला संघाने दुसऱ्या डावात 7 षटकात 8 बाद 260 धावा जमविल्या. जोशिता 9 तर साधू 2 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलिया अ महिला संघातील एडगरने 53 धावांत 4 तर प्रेस्टविजने 42 धावांत 2 तसेच ब्राऊन आणि जिंजीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यातील खेळाचा शेवटचा दिवस बाकी आहे.
संक्षिप्त धावफलक भारत अ महिला संघ प. डाव 89.1 षटकात सर्वबाद 299, ऑस्ट्रेलिया अ महिला संघ प. डाव 76.2 षटकात सर्वबाद 305 (जिंजीर 103, फेल्टुम 54, विल्सन 49, ट्रेनमन 21, ब्राऊन 22, ठाकुर 3-31, यादव, मणी प्रत्येकी 2 बळी, साधू, जोशिता, सरकार प्रत्येकी 1 बळी), भारत अ महिला संघ दु. डाव 73 षटकात 8 बाद 260 (राघवी बिस्त 86, शेफाली वर्मा 52, हसबनीस 39, सरकार 25, गुज्जर 20, काश्यप 12, राधा यादव 10, एडगर 4-53, प्रेस्टविज 2-43, ब्राऊन, जिंजीर प्रत्येकी 1 बळी).









