वृत्तसंस्था/ इंडोव्हेन (नेदरर्लंडस्)
भारत अ हॉकी संघ सध्या युरोपच्या दौऱ्यावर गेला असून संजयच्या नेतृत्त्वाखालील भारत अ हॉकी संघाचा पहिला सामना आयर्लंडबरोबर मंगळवारी होत आहे. या युरोपच्या दौऱ्यामध्ये भारत अ हॉकी संघ विविध देशांसमवेत 8 सामने खेळणार आहे.
भारत अ हॉकी संघासाठीचा हा युरोप दौरा हॉकी इंडियाने आयोजित केला आहे. देशातील हॉकीपटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव मिळावा या हेतूने या दौरा निश्चित केला आहे. भारत अ संघामध्ये अनुभवी आणि नवोदित हॉकीपटूंचा समावेश आहे. या संघाचे नेतृत्त्व संजयकडे सोपविण्यात आले आहे. भारत अ संघ आयर्लंडबरोबर तसेच फ्रान्स आणि नेदरर्लंडस्बरोबर प्रत्येकी दोन सामने खेळणार असून इंग्लंड आणि बेल्जियमबरोबर त्यांचा प्रत्येकी एक सामना आयोजित केला आहे. भारत अ हॉकी संघाच्या युरोप दौऱ्यातील मोहिमेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. मंगळवारचा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9-30 वाजता सुरू होईल.









