शेवटच्या अनधिकृत वनडेत ऑस्ट्रेलिया अ संघावर 2 गड्यांनी मात, प्रभसिमरनचे शतक
वृत्तसंस्था / कानपूर
यजमान भारत अ संघाने तीन सामन्यांच्या अनधिकृत वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारत अ ने 4 षटके बाकी ठेवून ऑस्ट्रेलिया अ चा 2 गड्यांनी पराभव केला. भारत अ संघातील रियान परागला ‘मालिकावीर’ तर प्रभसिमरन सिंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया अ संघाचा डाव 49.1 षटकात 316 धावांत आटोपला. त्यानंतर भारत अ संघाने 46 षटकात 8 बाद 322 धावा जमवित सामना आणि मालिका हस्तगत केली.
ऑस्ट्रेलिया अ संघामध्ये कोनोली, स्कॉट आणि कर्णधार एडवर्ड्स यांनी अर्धशतके झळकविली. कोनोलीने 49 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 64 तर स्कॉटने 64 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकारांसह 73, कर्णधार एडवर्ड्सने 75 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 89 धावा झळकविल्या. शॉने 34 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा झळकविल्या. भारत अ संघातर्फे अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 3 तर आयुष बदोनीने 2, गुरूजपनित सिंग आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ संघातील सलामीचा फलंदाज प्रभसिमरन सिंगने शानदार शतक झळकविले. त्याने 68 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकारांसह 102 धावा जमविल्या. अभिषेक शर्माने 25 चेंडूत 2 चौकारांसह 22 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर 58 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 62, रियान परागने 55 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 62, बदोनीने 2 चौकारांसह 21 तर निगमने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 24 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ तर्फे तन्वीर संघाने 72 धावांत 4 तर मर्फीने 42 धावांत 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया अ 49.1 षटकात सर्वबाद 316 (एडवर्ड्स 89, स्कॉट 73, कोनोली 64, शॉ 32, अर्शदीप सिंग व हर्षित राणा प्रत्येकी 3 बळी, बदोनी 2-31, गुरजपनित सिंग आणि सिंधू प्रत्येकी 1 बळी), भारत अ 46 षटकात 8 बाद 322 (प्रभसिमरन सिंग 102, श्रेयस अय्यर 62, रियान पराग 62, निगम नाबाद 24, बदोनी 21, अभिषेक शर्मा 22, सांघा आणि मर्फी प्रत्येकी 4 बळी)









