इमर्जिंग आशिया चषक : साई सुदर्शनचे नाबाद शतक : राजवर्धन हंगरगेकरचे पाच बळी
वृत्तसंस्था/ कोलंबो
यश धुलच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान अ संघाचा 8 गडी राखून पराभव करून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 206 धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारताने 36.4 षटकांत यशस्वीपणे गाठले आणि 8 विकेट्स राखून विजय मिळवला. 42 धावांत 5 बळी मिळवणारा राजवर्धन हंगरगेकर व 110 चेंडूत 104 धावांची नाबाद खेळी साकारणारा साई सुदर्शन भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत अ ने यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता, दि. 21 रोजी भारताची लढत बांगलादेशशी होईल.
पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे त्यांची तारांबळ उडाली. 9 धावसंख्येवर पाकिस्तानला दोन धक्के बसले. सईम अयूब आणि ओमर यूसुफ यांना भोपळाही फोडता आला नाही. यानंतर साहिबजादा फरहान आणि हसीबुल्लाह खान यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण 48 धावसंख्येवर तिसरी विकेट पडली. त्यानंतर 78 धावांत पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. अडचणीत असलेल्या पाकिस्तान संघासाठी कासिम अक्रम आणि मुबासिर खान यांनी संयमी फलंदाजी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. मुबासिर 28 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर कासिम याने मेहरान मुमताज याच्यासोबत 43 धावांची भागिदारी करत संघाचा डाव 200 पार नेला. कासिम अक्रमने 63 चेंडूत 48 धावांची खेळी केली. तर मेहरानने नाबाद 25 धावा केल्या. तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ 48 षटकात 205 धावांवर तंबूत परतला. भारताकडून राजवर्धन हंगरगेकरने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या तर मानव सुतारने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले.

साई सुदर्शनचे नाबाद शतक, जोसचेही अर्धशतक
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 206 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात शानदार झाली. सलामीवीर साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा या जोडीने 58 धावांची सलामी दिली. अभिषेक शर्मा 4 चौकारासह 20 धावा काढून तंबूत परतला. त्याला मुबासिर खानने बाद केले. अभिषेक बाद झाल्यानंतर साई सुदर्शनने निकिन जोससोबत संघाच्या डावाला आकार दिला. शर्मा आणि जोस यांनी दुसऱ्या गड्यासाठी 99 धावांची भागिदारी केली. या जोडीने संयमी फलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. जोसने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 64 चेंडूत 7 चौकारासह 53 धावा फटकावल्या. अर्धशतकानंतर मात्र तो लगेच बाद झाला. जोस बाद झाल्यानंतर कर्णधार यश धुल आणि साई सुदर्शन यांनी संयमी फलंदाजी केली. साई सुदर्शनने 110 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 104 धावांची खेळी केली. कर्णधार यश धुलने 19 चेंडूत नाबाद 21 धावांचे योगदान दिले. या जोडीने 36.4 षटकांत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
उपांत्य सामन्यात बांगलादेशचे आव्हान
पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ब गटात सहा गुणासह भारतीय संघ अव्वल राहिला. याआधीच्या सामन्यात भारताने नेपाळ व युएईला पराभूत केले आहे. अ गटात श्रीलंकन संघ अव्वल असून बांगलादेश संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आता, दि. 21 रोजी श्रीलंका व पाकिस्तान आणि भारत व बांगलादेश यांच्यात उपांत्य सामने होतील. यांच्यातील विजयी संघांचा अंतिम सामना दि. 23 रोजी होईल.









