सिंधूचे 5, सुतारचे 3 बळी, धूलचे अर्धशतक, बांगलादेश, लंकेचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ कोलंबो
येथे सुरु असलेल्या एसीसी पुरुषांच्या इमर्जिंग चषक वनडे क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या दिवस-रात्रीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत अ संघाने बांगलादेश अ संघाचा 51 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात पाक अ संघाने यजमान लंका अ संघावर 60 धावांनी विजय मिळवित अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता या स्पर्धेत भारत अ आणि पाक अ यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाचा डाव 49.1 षटकात 211 धावात आटोपला. त्यानंतर बांगलादेश अ संघाचा डाव 34.2 षटकात 160 धावात समाप्त झाला. भारत अ संघाच्या डावात कर्णधार यश धूलने 85 चेंडूत 6 चौकारांसह 66, अभिषेक शर्माने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 34, साई सुदर्शनने 3 चौकारांसह 21, रियान परागने 1 षटकारासह 12, हर्षित राणाने 1 षटकारासह 9, मानव सुतारने 3 चौकारांसह 21 आणि राजवर्धन हंगरगेकरने 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. भारत अ संघाच्या डावात 4 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. बांगलादेश अ संघातर्फे मेहदी हसन, टी. शकिब आणि रकिबुल हसन यांनी प्रत्येकी 2 तर आर. मोंडल, सैफ हुसेन आणि सौम्या सरकार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेश अ संघाच्या डावात सलामीच्या टी. हसनने 56 चेंडूत 8 चौकारांसह 51 धावा जमविताना मोहम्मद नईम समवेत पहिल्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. पण या भक्कम सलामीचा नंतरच्या फलंदाजांना लाभ उठवता आला नाही. नईमने 6 चौकारांसह 38 धावा केल्या. कर्णधार सैफ हसनने 4 चौकारांसह 22, मेहमुदूल हसनने 20 तर मेहदी हसनने 12 धावा जमविल्या. भारत अ संघातर्फे निशांत सिंधू सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 20 धावात 5 तर मानव सुतारने 32 धावात 3 तसेच डोडीया आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – भारत अ : 49.1 षटकात सर्व बाद 211 (यश धूल 66, अभिषेक शर्मा 34, साई सुदर्शन 21, निकिन जोस 17, पराग 12, मानव सुतार 21, हंगरगेकर 15, मेहदी हसन, टी. शकीब, आर. हसन प्रत्येकी 2 बळी, आर. मोंडल, सैफ हसन आणि सरकार प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश अ : 34.2 षटकात सर्व बाद 160 (मोहम्मद नईम 38, टी. हसन 51, सैफ हसन 22, मेहमुदूल हसन 20, मेहदी हसन 12, निशांत सिंधू 5-20, मानव सुतार 3-32, डोडीया, अभिषेक शर्मा प्रत्येकी 1 बळी).
पाक अ अंतिम फेरीत
पाक अ संघाने लंका अ संघाचा 60 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना पाक अ संघाने 50 षटकात सर्व बाद 322 धावा जमविल्या. त्यानंतर लंका अ संघाचा डाव 45.4 षटकात 262 धावात आटोपला.
पाक अ संघाच्या डावात ओमर युसूफने 88, कर्णधार मोहम्मद हॅरीसने 52, एम. खानने 42, सईम आयुबने 22, फरहानने 12, टी. ताहिरने 26 तर मोहम्मद वासिमने 24 धावा जमविल्या. लंका अ संघातर्फे समरकून, मधुसेन आणि करुणारत्ने यांनी प्रत्येकी 2 तर अर्चाजी आणि वेलालगे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना लंका अ संघाच्या डावात एस. अर्चाजीने 1 षटकार आणि 12 चौकारांसह 97, अविष्का फर्नांडोने 2 षटकार आणि 12 चौकारांसह 97, बंदाराने 4 चौकारांसह 17 व कर्णधार वेलालगेने 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. पाक अ संघातर्फे अर्षद इक्बालने 37 धावात 5 तर एम. खान आणि एस. मुक्किम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – पाक अ : 50 षटकात सर्व बाद 322, लंका अ : 45.4 षटकात सर्व बाद 262.