वृत्तसंस्था/ कोलंबो
येथे सुरू असलेल्या एसीसीच्या इमर्जिंग 2023 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे भारत आणि पाक अ यांच्यात जेतेपदासाठी चुरशीची लढत होणार आहे. हा सामना येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
क्रिकेट क्षेत्रामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीचे चुरशीचे होत असतात आणि जागतिक स्तरावर शौकिनांचा अमाप प्रतिसाद आजपर्यंत मिळत आहे. या स्पर्धेत भारत अ संघातील खेळाडूंनी लिग सामन्यात यापूर्वीच पाक अ संघाचा पराभव केल्याने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. मात्र रविवारच्या अंतिम सामन्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूवर विजयासाठी अधिक मानसिक दडपण राहिल. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी उभय संघ प्रयत्नांची शर्थ करतील.
या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय गोलंदाजांची बांगलादेश अ संघाच्या सलामीच्या जोडीने पहिल्या काही षटकात चांगलीच धुलाई केली होती. बांगलादेश अ संघाने 18 षटकात 1 बाद 94 धावापर्यंत मजल मारली होती पण त्यानंतर निशांत सिंधू आणि मानव सुतार या फिरकी गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव 160 धावात गुंडाळला. भारत अ संघाचा कर्णधार यश धूलने या सामन्यात 66 धावांची कप्तानी खेळी करत आपल्या संघाच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी बजावली होती. पाक संघातील अनुभवी अष्टपैलू मोहमद वासीम, कर्णधार मोहमद हॅरीस सलामीचा फलंदाज एस. फरहान तसेच वेगवान गोलंदाज अर्शद इक्बाल हे प्रमुख खेळाडू आहे. दरम्यान रविवारच्या सामन्यात भारतीय संघ सर्वच विभागात दर्जेदार खेळ करत सांघिक कामगिरीच्या जोरावर जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. मात्र पाककडून भारताला कडवा प्रतिकार होऊ शकेल. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असून सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ आपले अंतिम खेळाडू निश्चित करतील.









