चार दिवसीय कसोटी सामना पावसावर अवलंबून, प्रशिक्षक लक्ष्मणसह दिग्गज खेळाडूंचे हुबळीत आगमन

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बीसीसीआय व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना यांच्या मान्यतेनुसार हुबळी येथे भारत अ व न्यूझीलंड अ यांच्यातील चार दिवसीय कसोटी सामन्यासाठी भारत व न्यूझीलंड अ संघाचे हुबळी येथे आगमन झाले असून, मैदानाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार यांनी दिली.
हुबळीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे चेअरमन विरण्णा सवदी उपस्थित होते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेली दोन वर्षे क्रिकेट स्पर्धांना विराम लागला होता. पण यावषी बीसीसीआयने धारवाड विभागाला भारत अ व न्यूझीलंड अ यांच्यातील चार दिवशीय सामना दिला आहे.
हुबळीमध्ये नियमित पाऊस असून सुद्धा मैदानाच्या पिच क्मयूरेटर्सनी उत्तम तयारी ठेवली आहे. त्यामुळे या मैदानावर पावसाचा व्यत्यय नसल्यास सामना अतिशय उत्तम होईल, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. खेळपट्टीवर चेंडूना उसळी मिळणार असून मध्यमगती गोलंदाजांना व फिरकी गोलंदाजांना मदत होणार आहे. त्याचप्रमाणे फलंदाजीला देखील मदत मिळू शकते.
भारतीय युवा संघाचे प्रमुख प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांचेही आगमन हुबळीला झाले आहे. जर पावसाचा व्यत्यय नसल्यास हुबळीकरांना चांगला सामना पाहण्यास मिळेल, असे ते म्हणाले.









