वृत्तसंस्था/लखनौ
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात गुरूवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर यजमान भारत अ संघाला विजयासाठी अद्याप 243 धावांची जरुरी आहे. दिवसअखेर भारत अ संघाने दुसऱ्या डावात 2 बाद 169 धावा जमविल्या. दुखापतीमुळे सलामीचा फलंदाज के. एल. राहुल 74 धावांवर असताना निवृत्त झाला.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिला सामना अनिर्णीत राहिला. या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात 420 धावा जमविल्यानंतर भारत अ संघाचा पहिला डाव 194 धावांत आटोपला. साई सुदर्शन वगळता भारताचे इतर फलंदाज लवकर बाद झाले. जगदीशनने 38 तर बदोनीने 21 धावा जमविल्या. भारतातर्फे मानव सुतारने 5 तर ब्रारने 3 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलिया अ ने 3 बाद 16 या धावसंख्येवरुन गुरूवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. मानव सुतार, ब्रार, मोहम्मद सिराज आणि यश ठाकुर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया अ चा दुसरा डाव 185 धावांत आटोपला. फिलीपने 8 चौकारांसह 50 तर कर्णधार मॅकस्वीनीने 149 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 85 धावा जमवल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया अ प. डाव 97.2 षटकात सर्वबाद 420, भारत अ प. डाव 52.5 षटकात सर्वबाद 194, ऑस्ट्रेलिया दु. डाव 46.5 षटकात सर्वबाद 185 (मॅकस्वीनी नाबाद 85, फिलीप 50, मानव सुतार व ब्रार प्रत्येकी 3 बळी, मोहम्मद सिराज व यश ठाकुर प्रत्येकी 2 बळी), भारत अ दु. डाव 41 षटकात 2 बाद 169 (के.एल.राहुल दुखापतीमुळे निवृत्त 74, जगदीशन 36, पडीक्कल 5, मानव सुतार नाबाद 1, मर्फी 2-49).









