वृत्तसंस्था / इंडोव्हेन (नेदरलँड्स)
भारत अ पुरुष हॉकी संघाला सरावासाठी हॉकी इंडियाने युरोप दौऱ्यावर पाठविले होते. या दौऱ्यामध्ये त्यांचे अनेक सामने आयोजित केले होते. दरम्यान या दौऱ्यातील येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सने भारत अ संघाचा 8-2 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
या शेवटच्या सामन्यात भारत अ संघातर्फे राजिंदरसिंग आणि सेल्वम कार्ती यांनी प्रत्येकी 1 गोल केला. गेल्या आठवड्यात या दौऱ्यातील झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने भारत अ संघाचा 3-0 असा फडशा पाडला होता. 8 जुलैपासून भारत अ पुरुष हॉकी संघाच्या युरोप दौऱ्याला प्रारंभ झाला होता आणि या दौऱ्यात युरोपमधील पाच संघांबरोबर एकूण 8 सामने आयोजित केले होते. या दौऱ्यात भारत अ संघाने आयर्लंड, फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम आणि नेदरलँड्सबरोबर सामने खेळले असून भारत अ संघाने 8 पैकी केवळ तीन सामने जिंकले.









