वृत्तसंस्था / अॅम्स्टलवीन (नेदरलँड्स)
भारत अ पुरुष हॉकी संघाला त्यांच्या युरोपियन दौऱ्यावर सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्समधील अॅम्स्टलवीन येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना 2-3 असा पराभव पत्करावा लागला.
भारतीय युवा फॉरवर्ड मनिंदर सिंग आणि उत्तम सिंग यांनी वेगेनर स्टेडियमवर भारत अ संघासाठी गोल केले असले तरी संघाला जागतिक क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडविरुद्ध एका चुरशीच्या लढतीनंतर पराभव पत्करावा लागला.
सामन्यानंतर भारत अ प्रशिक्षक शिवेंद्र सिंग म्हणाले, या दौऱ्यात सुरुवातीला आम्हाला तीन चांगले विजय मिळाले होते आणि दोन खूप जवळचे पराभव. आम्हाला माहित होते की दौरा जसजसा पुढे जाईल तसतसे आम्हाला अधिक कठीण स्पर्धेचा आणि संघांचा सामना करावा लागेल. आम्ही आता प्रत्येक सामना जसा येतो तसा घेत आहोत आणि प्रगती करत आहोत. तसेतसे त्यातून शिकत आहोत. आमचे अजूनही दोन खरोखर चांगल्या संघाविरुद्ध तीन सामने शिल्लक आहेत आणि आता ते खेळण्यास उत्सुक आहोत.
भारत अ पुरुष हॉकी संघ आता गुरुवारी बेल्जियम संघाविरुद्ध खेळण्यासाठी अँटवर्पला रवाना होईल. त्यानंतर ते 18 आणि 20 जुलै रोजी नेदरलँड्सविरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी आइंडहोव्हनला रवाना होतील आणि त्यानंतर भारतात परततील. दौऱ्याच्या सुरुवातीला, भारत अ पुरूष हॉकी संघाने त्यांच्या युरोपियन दौऱ्यावर आणखी एक महत्त्वाचा विजय नोंदवत चांगली कामगिरी केली. त्यांनी आइंडहोव्हनमधील हॉकी क्लब ओरांजे-रुड येथे झालेल्या दौऱ्यातील तिसऱ्या सामन्यात फ्रान्सचा 3-2 असा पराभव केला. भारत अ पुरुष हॉकी संघाने फॉरवर्ड आदित्य अर्जुन लालगेने दोन गोल केले तर त्याचा सहकारी बॉबी सिंग धामीनेही स्कोअरशीटवर स्थान मिळविले. आदित्य अर्जुन लालगेने पहिला गोल केला, त्यानंतर त्याने एका पीसीमध्येही रुपांतर केले. बॉबी सिंग धामीने भारतासाठी तिसरा गोल केला आणि त्यांनी विजय मिळविला. दरम्यान फ्रान्ससाठी दोन्ही गोल क्लेमेंटने केले होते.









