जपान अव्वल तर चीन दुसऱ्या स्थानी : : अखेरच्या दिवशी 8 रौप्य व 5 कांस्यपदकांसह भारताला एकूण 27 पदके
वृत्तसंस्था/ बँकॉक
थायलंडची राजधानी बँकॉक येथे पार पडलेल्या 25 व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने 6 सुवर्ण, 12 रौप्य व 9 कांस्यपदकासह एकूण 27 पदकांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले. जपानने 16 सुवर्णपदकासह एकूण 37 पदके मिळवत अव्वल स्थान पटकावले तर चीनने 8 गोल्डसह 22 पदकांची कमाई करत दुसरे स्थान मिळवले. विशेष म्हणजे, भारताची आशियाई चॅम्पियनशिपमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
परदेशात झालेल्या स्पर्धेत मात्र, भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी यजमानपद भूषविताना 2017 च्या भुवनेश्वर येथील स्पर्धेत भारताने 10 सुवर्णपदकांसह 29 पदके जिंकली होती. भारताबाहेर म्हणजे 1985 च्या जकार्ता स्पर्धेत भारताने 10 सुवर्णांसह 22 पदके जिंकली होती. दरम्यान, स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच रविवारी भारताने 8 रौप्य व 5 कांस्यपदकांची कमाई केली. भारताच्या या शानदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अॅथलेटिक्स महासंघाने भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
20 किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांकाला रौप्य
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच रविवारी पहिल्या सत्रात भारताकडून विकास सिंग आणि प्रियांका यांनी 20 किमी चालण्याच्या शर्यतीत पदके जिंकत अखेरच्या दिवसाची सुरुवात चांगली करुन दिली. प्रियांकाने 1 तास 34 मिनिटे, 24 सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक आणि विकासने 1 तास 29 मिनिटे, 33 सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले. यापूर्वी 1991 मध्ये पुरुषांच्या शर्यतीत भारताने चालण्याच्या शर्यतीत पदक जिंकले होते यानंतर यंदाच्या स्पर्धेत प्रियांका व विकास यांनी ही शानदार कामगिरी केली आहे. दोघेही आता पुढील महिन्यात हंगेरी येथे होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहेत.
महिलांच्या गोळाफेकमध्ये राष्ट्रीय विक्रमासह आभाला रौप्य
दरम्यान, महिलांच्या गोळाफेक प्रकारात 28 वर्षीय आभा खातुआने आपल्या चौथ्या प्रयत्नात 18.06 मीटर अंतरावर गोळा फेकला. आभाची ही कामगिरी राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी करणारी ठरली. मात्र, सुवर्णपदकापासून आभा 82 सेंटिमीटरने दूर राहिली. या कामगिरीमुळे स्पर्धेच्या इतिहासात महिला गोळाफेकीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. डोपिंगची शिक्षा भोगून पुनरागमन करणाऱ्या मनप्रीत कौरने 17 मीटर कामगिरीसह कांस्यपदक जिंकले. चीनच्या सोंग जियायुआनने सुवर्णपदक मिळवले.
800 मीटर शर्यतीत दोन्ही गटात रौप्य
800 मीटरच्या दोन्ही शर्यतीतही भारतीय धावपटूंनी पदक जिंकण्याची किमया केली. पुरुषांत हरियानाच्या किशन कुमारने 1 मिनिट 45.88 सेकंद, तर महिलांत दिल्लीच्या के. एम. चंदाने 2 मिनिटे 01.58 सेकंद वेळ देत रौप्य जिंकले. टिंटू लुकानंतर चंदाने भारताला आठ वर्षांनंतर पदक मिळवून दिले.
पारुल, ज्योतीचे दुसरे पदक
पारुल चौधरी व ज्योती येराजी यांनी स्पर्धेतील आपले दुसरे पदक जिंकले. तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पारुल चौधरीने पाच हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने 15 मिनिटे 52.35 सेकंद अशी वेळ दिली. भारताच्याच अंकिताने 16 मिनिटे 03.33 सेकंदात कांस्यपदक जिंकले. तसेच पुरुष गटात गुलवीर सिंगने पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकून लांब पल्ल्याच्या शर्यतीतील भारताची गौरवशाली परंपरा कायम राखली.
याशिवाय, 100 मीटर हर्डल्स शर्यतीत भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ज्योती येराजीला 200 मीटर शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने 23.13 सेकंद अशी मोसमातील सर्वोत्तम वेळ दिली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राने 400 मीटरमध्ये कांस्य, मिश्र रिलेत सुवर्ण व 4×400 रिलेत कांस्यपदक अशा तीन पदकांची कमाई केली.
4×400 मीटरमध्ये दोन रौप्य
पुरुष व महिलांच्या 4×400 मीटर रिले प्रकारात भारताने रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या 4×400 मीटर रिले शर्यतीत अमोज जेकब, मोहम्मद अजमल, मिजो कुरियन चाको, राजेश रमेश या चमूने (3 मिनिटे 1.80 सेकंद) वेळ नोंदवत रौप्य मिळवले तर महिलांच्या 4×400 मीटर रिले शर्यतीत रेझोआना मल्लिक हिना, ऐश्वर्या मिश्रा, ज्योतिका दंडी, सुभा वेंकटेशन हा चमू (3 मिनिटे 33.73 सेकंद) कांस्यपदकाच्या मानकरी ठरला.
याशिवाय, पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या डीपी मनूने रौप्यपदकाची कमाई केली. त्याने 81.01 मीटर भाला फेकला. या प्रकारात जपानला सुवर्णपदक मिळाले.
स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे भारतीय खेळाडू
- ज्योती याराजी – महिला 100 मीटर हर्डल
- अब्दुल्ल अबुबाकर – पुरुष तिहेरी उडी
- पारुल चौधरी – महिला 3000 मीटर
- अजय कुमार सरोज – पुरुष 1500 मीटर
- तेजिंदरपाल सिंग तूर – पुरुष गोळाफेक
- 4-400 मीटर रिले मिश्र संघ
पदकतालिका
क्र. देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
- जपान 16 11 10 37
- चीन 8 8 6 22
- भारत 6 12 9 27
- श्रीलंका 3 2 3 8
- कतार 2 1 1 4.
ट्विट
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन! प्रत्येक भारतीयाला तुमच्या कामगिरीचा अभिमान असून पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी.









