विविध मागण्या सोडविण्याकडे दुर्लक्ष : अधिकाऱ्यांकडून कामे करण्यास चालढकल
बेळगाव : प्रभागातील काही समस्या घेऊन गेल्यास त्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करणे, असहकार्य करणे, वेगवेगळी कारणे सांगून विलंब धोरण राबविणे, या कारणामुळे त्रस्त बनलेले अपक्ष नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांनी सोमवार दि. 3 रोजी महानगरपालिकेसमोर उपोषण छेडले होते. मात्र, काउन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी यांनी समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले.
शहरातील प्रभाग क्र. 7 मध्ये असलेल्या महापालिकेच्या जुन्या इमारतीत 26 डिसेंबर 1939 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. तात्कालीन महापौर भीमराव पोतदार यांनी त्यांचा सत्कार केला होता. त्यामुळे जुन्या महानगरपालिकेची इमारत ऐतिहासिक वास्तू बनली आहे. 21 जुलै 2023 रोजी महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत सदर इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि म्युझियमबाबत चर्चा झाली होती. त्याचबरोबर 3 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत या कामी 68 लाख रुपयांचा निधीदेखील 2024-25 सालातील एसएफसी अनुदानातून मंजूर झाला होता. तरीदेखील या कामाची मनपा अधिकाऱ्यांकडून सुरुवात करण्यात आलेली नाही. याबाबत प्रादेशिक आयुक्तांनीही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे.
गणाचारी गल्लीतील बकरी मंडईत अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत मनपा अधिकाऱ्यांना माहिती देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या कोणत्याही विभागात गेल्यास व्यवस्थित माहिती दिली जात नाही. एखादे काम घेऊन गेल्यास ते वेळेत करून दिले जात नाही. एजंटाची कामे मात्र तातडीने करून दिली जात आहेत. आपत्कालीन काळात एखादे काम करण्यास अधिकाऱ्यांना सांगितल्यास निधी नसल्याचे सांगितले जात आहे. नगरसेवक म्हणून निवडून येऊन दोन वर्षे झाली तरीदेखील बहुतांश अधिकारी व कर्मचारी ओळख नसल्यासारखे वर्तन करतात. स्वच्छता, पिण्याचे पाणी, पथदीप व इतर समस्या सोडविण्यास विलंब केला जात आहे. अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून अपक्ष नगरसेवकांना वेगळी वागणूक दिली जात आहे. प्रभागातील कामे होत नसल्याने मतदारांचा विश्वास गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, यासाठी नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांनी सोमवारी महानगरपालिकेसमोर उपोषण केले.









