गोवा विद्यापीठ मैदानावर होणार मुख्य सोहळा : तालुका, जिल्ह्य़ासह सर्व स्तरांवर कार्यक्रम,राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा
प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्याचा 61 वा मुक्तीदिन आज सोमवार दि. 19 डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्यावेळी राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकावला जाणार आहे. दरवर्षी राज्य स्तरावर पणजीत होणारा मुक्तीदिन सोहळा यंदा पणजी शहराच्या बाहेर गोवा विद्यापीठ मैदान बांबोळी येथे सकाळी 9 वाजता साजरा होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मंत्रीगण त्यावेळी उपस्थित राहून ध्वज फडकवतील आणि राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करतील.
शाळा, कॉलेज, विद्यापीठ तसेच जिल्हा, तालुका पातळीवर मुक्तीदिनानिमित्ताने ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. काही संस्था, संघटना मुक्तीदिनाचा योग साधून स्पर्धा व इतर अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवणार आहेत. पणजीत दरवर्षी कांपाल मैदानावर मुक्तीदिन सोहळा होत असे. यंदा तेथे स्टेडियमचे काम चालू असल्याने मुक्तीदिनाचा सोहळा करणे शक्य नाही म्हणून तो गोवा विद्यापीठ मैदान बांबोळी या नवीन ठिकाणी आखण्यात आला आहे.
फोंडा येथे क्रांती मैदान, मडगांव येथे लोहिया मैदान व इतर अनेक ठिकाणी ध्वजवदंनाचे कार्यक्रम होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालये येथेही मुक्तीदिन कार्यक्रम आखण्यात आला आहे.
राज्यपालांच्या शुभेच्छा
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना ऐतिहासिक गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात 1961 च्या या गौरवशाली दिवशी, शेवटच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलने विजयी भारतीय सशस्त्र दलांसमोर आत्मसमर्पण केले आणि पोर्तुगीज राजवटीतून गोव्याच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला. गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवाच्या या ऐतिहासिक सोहळय़ात सामील होताना मला अभिमान वाटतो. या आजच्या दिवशी आपण गोव्याच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. गोव्याची एक वेगळी ओळख आहे की गोव्याच्या लोकांनी विविध आव्हानांना तोंड देत स्वातंत्र्यानंतरच्या काळात जतन आणि संरक्षण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले. 1967 च्या ओपिनियन पोलने गोव्याची ही खास ओळख झाली. 1987 मध्ये राज्याचा उदय हा आपला वेगळा वारसा टिकवून ठेवण्याच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. भारतीय राज्यघटनेच्या 8 व्या परिशि÷ात कोंकणीचा समावेश केल्याने राज्याचे व्यक्तिमत्त्व अधिक दृढ झाले. ही खास ओळख टिकवून ठेवण्यासाठी कठोर संघर्ष केला त्याबद्दल गोव्यातील सर्व नेत्यांचे आणि जनतेचे आपण अभिनंदन करतो, असे राज्यपालांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 19 डिसेंबर 1961 रोजी 450 वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून स्वातंत्र्य मिळविलेल्या आपल्या सुंदर राज्याच्या मुक्ती दिनाच्या गोव्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस खरोखरच ऐतिहासिक आणि उल्लेखनीय आहे, असे म्हटले आहे.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, गोवा मुक्तिसंग्रामातील दिग्गजांप्रती कृतज्ञता व्यक्त करून भावी पिढीला शांतता आणि सन्मानाने जगता यावे यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी कठोर संघर्ष केला आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. दीर्घकाळ चाललेल्या स्वातंत्र्यलढय़ात प्राणाची आहुती देणाऱया स्वातंत्र्यसैनिकांचे आज आपण स्मरण करतो.
स्वातंत्र्योत्तर नेत्यांनी आपले राज्य उभारण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांचे ते प्रयत्न आपण लक्षात घेतले पाहिजेत. गोव्याने पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक कल्याण, कौशल्य विकास आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या सरकारच्या उपक्रमांद्वारे आपण राज्याच्या प्रगतीसाठी कार्य करूया आणि राज्याला उच्च शिखरावर नेण्यासाठी आपले प्रयत्न चालू ठेवूया. सर्व मतभेद विसरून एकत्रित प्रयत्नातून विकासाच्या ध्येयाकडे वाटचाल करुया. गोवा स्वच्छ, हिरवागार आणि शाश्वत ठेवण्याचा संकल्प आपण करूया. गोवा मुक्ती दिनाच्या सर्वांना शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.









