संपात 840 कामगार होणार सहभागी : विद्यार्थ्यांची पालकांनी व्यवस्था करावी
पणजी : तुटपुंज्या पगारावर काम करत असतानाही प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या बालरथ कर्मचाऱ्यांना सरकारने मात्र आजवर केवळ आश्वासनांवरच झुलवत ठेवले आहे. त्यांनी दिलेली निवेदने जशी काही शीतपेटीतच टाकली असून कोणतीही मागणी पूर्ण होत नसल्यामुळे राज्यभरातील बालरथ कर्मचारी आजपासून संप पुकारणार आहेत, अशी माहिती या कामगार संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी दिली. युनायटेड बालरथ कर्मचारी संघटनेच्या बॅनरखाली हे कामगार एकत्र आले असून राज्यभरातील 420 बालरथ बसेसवरील 840 कामगार या संपात सहभागी होणार आहेत. त्यासंबंधी यासंघटनेतर्फे संपाची नोटीस शिक्षण खाते तसेच सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना दिली आहे. यासंबंधी यापूर्वीही या संघटनेतर्फे कायदेशीररित्या पूर्वसूचनाही दिली होती. दरम्यान या संपामुळे बालरथ बसेसवर अवलंबून असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत पोहोचविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. या कामगारांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला होता. परंतु दरवेळी आश्वासनांशिवाय त्यांना काहीच मिळेलेले नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या विविध मागण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. तरीही स्वत: मुख्यमंत्रीही त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत नाहीत, असा आरोप संघटनेने केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचीही अद्याप पूर्तता झालेली नाही, असे केरकर यांनी सांगितले.
या कामगारांनी संसार करायचा कसा?
बालरथ बसचालकास 12 हजार ऊपये देण्यात येतात तर वाहकांना अगदीच अल्प म्हणजे 5500 ऊपये पगार मिळतो. आजच्या महागाईच्या जमान्यात जेथे एक गॅस सिलिंडरसुद्धा 1200 ऊपये एवढा महाग झालेला असताना एवढ्या क्षुल्लक पगारात या कामगारांनी संसार कसा करावा? एवढा कमी पगार देऊन सरकारने त्यांची थट्टा चालविली आहे का? असे सवाल केरकर यांनी उपस्थित केले आहेत.
कामगारांना अपघात विमाही नाही मिळत
आश्चर्यकारक प्रकार म्हणजे या कामगारांना अपघात विमा मिळत नाही. त्यामुळे एखाद्या चालक किंवा वाहकाचा अपघातात बळी गेल्यास त्याच्या कुटुंबाला काहीच लाभ मिळत नाही. तरीही हे कामगार 11-12 वर्षांपासून या तुटपुंज्या पगारावर प्रामाणिक सेवा देत आहेत. परंतु सरकार मात्र त्यांच्या सेवेची कदर करत नाही, असा आरोपही संघटनेने केला आहे.









