मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या : 40 वर्षांपासून डाकसेवक शासकीय सुविधांपासून वंचित : केंद्र सरकारविरोधात संताप
बेळगाव : कमलेश चंद्र आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ग्रामीण डाकसेवकांनी मागील चार दिवसांपासून बेमुदत आंदोलन हाती घेतले आहे. शुक्रवारी चौथ्या दिवशीही आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर कायम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच रहाणार, अशी भूमिका ग्रामीण डाकसेवकांनी घेतली आहे. मागील 40 वर्षांपासून डाकसेवकांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. देशात सर्वत्र डाकसेवकांनी कमलेश चंद्र आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेळगाव मुख्य डाक कार्यालयातदेखील डाकसेवकांनी बेमुदत आंदोलन सुरू ठेवले आहे.
डाकसेवकांचे जीवनमान हलाखीचे
सुप्रिम कोर्टाने कमलेश चंद्र आयोगानुसार ग्रामीण डाकसेवकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असा आदेश जारी केला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून या आदेशाची पायमल्ली करून डाकसेवकांवर अन्याय केला जात आहे. परिणामी डाकसेवकांना पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनही कठीण होऊ लागले आहे. कमलेश चंद्र आयोग तातडीने लागू करावा, अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, काही डाकसेवक निवृत्त झाले तरी अद्याप या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे डाकसेवकांचे जीवनमान हलाखीचे बनले आहे. ग्रामीण भागात डाकसेवक घरोघरी जाऊन संध्या सुरक्षा, विधवा पेन्शन, वृद्धाप पेन्शन, दिव्यांग पेन्शन आदी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. मात्र, पेन्शन पोहोचवणारे डाकसेवकच पेन्शनपासून वंचित असल्याची खंतदेखील डाकसेवकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण डाकसेवा विस्कळीत
ग्रामीण डाकसेवकांनी 12 डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. पत्रव्यवहार, पेन्शन, बँकिंग सेवा आणि इतर सेवा ठप्प झाल्या आहेत. कार्यकारी अध्यक्ष पी. आर. पाटील, कार्यदर्शी शिवाप्पा बळगण्णावर, खजिनदार टी. एस. पाटील, शैलजा तल्लूर, परिमळा दारोजी, मंजुषा कुलकर्णी, निर्मला गाणगी यासह अधिक ग्रामीण डाकसेवक सहभागी झाले आहेत.
आंदोलन मोडून काढण्यासाठी दबाव…
आंदोलन मोडून काढण्यासाठी सर्कल पातळीवरून दबाव आणला जात आहे. मात्र, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन कायम रहाणार आहे.
– रामा आनंदाचे (ग्रामीण डाकसेवक)









