विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ‘बेंगळूर चलो’ची हाक
बेळगाव : राज्यातील समुदाय आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी तत्त्वावर सेवा बजाविणाऱ्या आरोग्याधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी दि. 15 पासून बेंगळूर येथील फ्रिडमपार्क येथे बेमुदत कालावधीसाठी धरणे आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. अनेकवेळा सरकारकडे मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अखिल कर्नाटक राज्य समुदाय आरोग्य एनएचएम कंत्राटी नोकर संघाच्या बेळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ग्रामीण भागातील समुदाय आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या सात वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर सेवा बजाविण्यात येत आहे. आपल्या समस्यांबाबत आरोग्य खात्याचे अधिकारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे निर्देशक तसेच आरोग्य खात्याच्या मंत्र्यांकडे मागण्यांच्या पुर्ततेसाठी अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र आपल्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
सीपीएचसी-युएचसी मार्गसुचीनुसार सहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या समुदाय आरोग्य केंद्रांतील अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना 15 टक्के वेतनवाढ करण्यात येते. ही वेतनवाढ समुदाय आरोग्य केंद्रांतील आरोग्याधिकाऱ्यांना लागू करण्यात यावी. रोखून धरण्यात आलेली पाच टक्के वार्षिक वेतनवाढ व 10 टक्के लॉयल्टी बोनस त्वरित देण्यात यावा. कारण नसताना निलंबित करण्यात आलेल्या सर्व समुदाय आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात यावे. नियमानुसार मासिक प्रोत्साहन धन 15 हजार देण्यात यावे. समुदाय आरोग्य केंद्रांतील आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य विमा आणि पीएफ सुविधा देण्यात यावी. एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यासाठी सुविधा द्यावी. 15 व्या वित्त आयोगांतर्गत 13 जिल्ह्यातील समुदाय आरोग्याधिकाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. ते वेतन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी उपस्थित होते.









