कर्जाची रक्कमच 7-8 लाखाच्या घरात
बेळगाव : विणकरांच्या आत्महत्या सुरूच आहेत. साईनगर, धामणे रोड, वडगाव येथील एका कर्जबाजारी विणकर तरुणाने आपल्या कारखान्यात गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. बुधवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला आहे. सतीश चंद्रकांत कामकर (वय 29) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. बुधवार दि. 4 ऑक्टोबर रोजी धामणे रोड, वडगाव, निजामियानगर परिसरातील आपल्या कारखान्यात त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सतीशच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्याला दारूचे व्यसन जडले होते. विणकर व्यवसायात नुकसान झाल्यामुळे त्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. कर्जाची रक्कमच 7 ते 8 लाखाच्या घरात पोहोचली. त्याची परतफेड करता न आल्याने झालेल्या मनस्तापातून त्याने आपले जीवन संपविले आहे. सतीशची पत्नी अक्षता हिने दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









