ऑनलाईन टीम
टी20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतही विजयी सुरुवात करत 1-0 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंड विरोधात पुण्यात सुरू असणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांतील पहिला सामना भारतीय संघाने 66 धावांनी जिंकला. 318 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या इंग्लंड संघाचा डाव 42.1 षटकांत 251 धावांवरच आटोपला. सुरुवातील महागडा ठरलेल्या प्रसिद्ध कृष्णाने उत्तरार्धात दमदार पुनरागमन केले. कृष्णाने 4 तर शार्दुल ठाकूरने तीन बळी घेतले. भुवनेश्वर कुमारने दोन तर नवोदित क्रुणाल पांड्याने एक गडी बाद केला. पदार्पनाच्या सामन्यात कृष्णा आणि क्रुणालची कामगिरी लक्षवेधी ठरली.
तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने इंग्लंडसमोर 318 धावांचे आव्हान उभे केले. भारताने 50 षटकात 5 बाद 317 धावा केल्या. यात शिखर धवनने 98, केएल राहुलने नाबाद 64 तर कृणाल पांड्याने धडाकेबाज 58 धावा केल्या.
सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी जोडीने भारतासाठी सलामी दिली. 10 षटकात भारताने बिनबाद 39 धावा केल्या. त्यानंतर 13 व्या षटकात भारताने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा झेलबाद झाला. रोहितने 42 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावांची खेळी केली. यानंतर आलेल्या विराट कोहलीसोबत शिखर धवनने संघाची धावसंख्या पुढे नेली. तर धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. धवनच्या अर्धशतकानंतर विराटनेही अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकी खेळीनंतर मार्क वूडने विराटला बाद केले. विराटने 6 चौकारांसह 56 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर 6 धावांची भर घालून वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
सामन्याच्या 39 व्या शतकात धवनला शतकाने हुलकावणी दिली. धवन 98 धावांवर मॉर्गनकरवी झेलबाद झाला. धवननंतर आलेला हार्दिक पंड्या देखील धडाकेबाज ५८ धावा करत बाद झाला. आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताची मधली फळी ढेपाळली. यानंतर कृणाल, राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली. कृणालने 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 58 तर, राहुलने 43 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 62 धावा केल्या.









