प्रतिनिधी/ बेळगाव
केएलएस जीआयटी कॉलेजमध्ये शनिवारी इन्क्युबेशन सेंटर व एआय लॅबचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनंत मंडगी यांच्या हस्ते झाले. केएलएस ग्रीड (जीआयटी रिसर्च, इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट सेंटर) असे याचे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या इन्क्युबेशन सेंटरमुळे नवउद्योजकांना संशोधनासाठी मदत होणार असल्याचे उद्घाटनप्रसंगी सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील उद्यमशीलता वाढविण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. उद्योग जगताचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण इन्क्युबेशन सेंटरतर्फे दिले जाणार आहे. यामध्ये तज्ञांकडून विद्यार्थ्यांना तांत्रिक व व्यावसायिक सल्ला दिला जाणार आहे. सध्या या ठिकाणी 8 स्टार्टअप सुरू करण्यात आले असून 50 हून अधिक स्टार्टअपना सेंटरच्या माध्यमातून मदत केली जाऊ शकते. येत्या काही काळात केएलएस जीआयटीमध्ये येत्या 18 महिन्यात 25 हजार चौरस फुटांचे अत्याधुनिक इन्क्युबेशन सेंटर बांधले जाणार असल्याचे अध्यक्ष अनंत मंडगी यांनी सांगितले. विधीया या नव्या एआय लॅबचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. सध्या जगभरात एआय टेक्नॉलॉजीवर संशोधन सुरू असून याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी स्वतंत्र लॅब सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी विधीया एचजीएक्स एच-200 जीपीयू हे नवे सर्व्हर सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य, प्राचार्य डॉ. एम. एस. पाटील, डॉ. श्वेता गौडर, गजेंद्र त्रिपाठी, राम भंडारे, विवेक कुलकर्णी, एस. व्ही. गणाचारी, आर. एस. मुतालिक, राजेंद्र बेळगावकर, उज्ज्वला मंडगी, अशोक कुलकर्णी, व्ही. एम. देशपांडे यांसह इतर उपस्थित होते.









