क्षेपणास्त्र-ड्रोन्सचा वाढता वापर : अमेरिकन यंत्रणा टार्गेटवर
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले सुरूच ठेवले असून आता अमेरिकन शस्त्रास्त्रांना टार्गेट केले जात असल्याचे उघड झाले आहे. रशियाने शनिवार, 12 जुलै रोजी युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यासाठी 560 ते 700 ड्रोन्सचा वापर करण्यात आला. तसेच 15 हून अधिक केएच-101 क्रूझ क्षेपणास्त्रेही वापरण्यात आली. हल्ल्याचे मुख्य लक्ष्य ल्विव्ह, लुत्स्क आणि चेर्निव्हत्सी ही ठिकाणे होती, असा दावा युक्रेनियन हवाई दलाने केला आहे.
रशियाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ‘शाहिद’ आणि ‘डिकोय’ ड्रोनने युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्याचा पोलंड आणि बेलारूस सीमेजवळील वायव्य युक्रेनमधील लुत्स्क शहराला सर्वाधिक फटका बसला. तसेच इतर 10 प्रदेशांवरही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. लुत्स्कमध्ये युक्रेनियन लष्करी हवाई तळ आहे. येथे मालवाहू विमाने आणि लढाऊ विमाने नियमितपणे शहरातून उ•ाण करतात. युक्रेनचे पश्चिमेकडील प्रदेश युद्धात लॉजिस्टिकदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र असल्याने तेथील विमानतळ आणि डेपो महत्त्वाच्या परदेशी लष्करी मदतीचा पुरवठा करतात. या भागातूनच नंतर विविध वस्तू देशाच्या इतर भागात पाठवल्या जातात.
रशियाने अलीकडेच मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करून युक्रेनियन हवाई संरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतेक हल्ल्यांमध्ये ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. यापूर्वी, रशियाने 4 जुलै रोजी सर्वाधिक हल्ले केले होते. रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये घुसखोरी करण्यासाठी एक नवीन मोहीम देखील सुरू केली आहे.









