काकती, होनगा परिसरात यंदा सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून ऊस लागवडीचे व्यवस्थापन
वार्ताहर /काकती
काकती, होनगा परिसरात यंदा ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून लागवडीचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. यापूर्वी उसाची उचल वेळेवर होत नव्हती. तसेच बिलही वेळेत मिळत नव्हते. अशातच वाजवी दर मिळत नव्हता. वजनकाट्यात तफावत होती. परिणामी गेल्या वीस वर्षात शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरविली होती. उत्पादन खर्चाशी तोंडमिळवणी करताना शेतकरी हतबल झाला होता. भात पिकाला अग्रक्रम देऊन व पर्यायी पीक म्हणून भाजीपाला पिकांकडे शेतकरी वळला होता. सुगीत भाताला मिळणारा कमी दर, प्रत्येक पोत्याला एक किलो तुटीची वजावट, घरी भात साठवायला पुरेशी जागा नसल्याने विक्री होत असते. व्यापारी कमी दरात खरेदी करत असत. तसेच उन्हाळ्यात भाजीपाल्याला भाव निश्चित नसल्याने उत्पादन खर्च निघेनासा झाला. मात्र यंदा दुष्काळ असल्याने सिंचनाची सोय असलेल्यांची भात पिकांची सुगी झाली. भाताला उच्चांकी दर मिळत आहे. भात पिकांचा तुटवडा असल्याने भाताची जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. ही जमेची बाजू यंदा असली तरी पुढच्यावर्षी भाताचा भाव टिकून राहील याची खात्री नसल्याने ऊस पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
मार्कंडेय साखर कारखान्याकडून उसाची उचल
येथील मार्कंडेय साखर कारखान्यात 2018 साली यंत्राची पूर्ण उभारणी होऊन प्रायोगिक तत्त्वावर उसाचे गाळप झाले. यामुळे काकती, होनगासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे लक्ष दिले आहे. वेळेवर उसाची उचल, वजनमापात पारदर्शकता ठेवली असून महिन्याभरात एकाच हप्त्यात उसाची बिले दिली जात आहेत. यामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे.
सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब
ऊस लागवडीपासून शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. उसाची निरोगी वाढ होण्यासाठी बियाणे प्रक्रिया केली जात आहे. ऊस बियाण्यातील अंतर, दोन डोळे, एक डोळे व रोपवाटिकेची लागवड पद्धत उसाला खत भरती देण्याची सुधारीत पद्धत, सेंद्रीय पद्धतीचा अवलंब, पीक फेरपालट आदींमुळे ऊस शेतीत क्रांतीकारक बदल झाला असल्याचे दिसून येत आहे. परिणामी उसाचे एकरी उत्पादन वाढत असल्याने या भागात उसाचे क्षेत्र वाढणार आहे.









