वार्ताहर /जांबोटी
खानापूर विधानसभा मतदारसंघातील म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांनी शुक्रवारी कणकुंबी विभागात झंझावाती प्रचार दौरा केला. प्रथम कणकुंबी येथील माउली देवीचे दर्शन घेऊन गाऱ्हाणा घालण्यात आला. यानंतर कणकुंबी गावातून भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. कणकुंबी बसस्थानकावर जाहीर सभा घेण्यात आली. व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी जांबोटी-कणकुंबी विभागात मुरलीधर पाटील यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. निरंजन सरदेसाई म्हणाले, कणकुंबीच्या दुर्गम भागातील मराठी भाषिकांनी समितीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. राष्ट्रीय पक्षाने दुर्गम भागात विकासाचे गाजर दाखवत मराठी अस्मिता, मराठी संस्कृती व भाषा संपवण्याचा चंग बांधला आहे. यासाठी मतदारांनी समितीच्या उमेदवारालाच मतदान करावे, अन्यथा मराठी शाळा, मराठी भाषा संपून जाईल. विलास बेळगावकर म्हणाले, सीमालढ्याच्या चळवळीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कणकुंबी, जांबोटी भागाने सीमालढ्याला पाठबळ दिलेले आहे. त्यामुळेच समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. म्हणून बालेकिल्ला ढासळु नये यासाठी या भागातील मतदारांनी समितीला मतदान करावे. रणजीत पाटील, यशवंत बिर्जे यांचीही भाषणे झाली. माजी आमदार दिगंबर पाटील व जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई यांच्या नेतृत्वाखाली भागातील कालमणी, चिखले, बेटणे, चिगुळे, पारवाड, कणकुंबी आदी गावात जाऊन प्रचारफेरी काढून घरोघरी निवडणूक पत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मतदारांनी समिती उमेदवार मुरलीधर पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रचार फेरीत माऊती परमेकर, विलास बेळगावकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, हणमंत मेलगे, दीपक देसाई, नारायण कापोलकर, आबासाहेब दळवी, सदानंद पाटील, हणमंत जगताप, नारायण शिंदे, कृष्णा देसाई, शिवाजी सडेकर, बळीराम देसाई, विजय गुरव, नारायण गुरव व कार्यकर्ते सहभागी होते.
मुरलीधर पाटील यांची गोधोळी-गोदगेरी भागात प्रचारात आघाडी
खानापूर : मराठी अस्मितेसाठी संघर्षाचा, बलिदानाचा इतिहास असलेल्या म. ए. समितीच्या लढ्याला बळ देण्यासाठी मराठी संस्कृती व मराठी भाषा टिकविण्यासाठी तमाम मराठी बांधवांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे व समितीचा बुलंद आवाज विधानसभेत पाठवावा, असे आवाहन तावरकट्टी येथे झालेल्या सभेत भाग्यश्री यांनी केले. तावरकट्टी, गोधोळी, गोदगेरी भागातील मतदारानी समितीच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे जाहीर केले. समिती उमेदवार मुरलीधर पाटील यांनी कार्यकर्त्यांसह गोधोळी परिसरातील गावांमध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच कोपरा सभा घेण्यात आली. रात्री तावरकट्टीत सभा घेऊन मतदारांना समिती उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, राजाराम देसाई, दिगंबर पाटील, निरंजन सरदेसाई, जगन्नाथ बिरजे, मऱ्याप्पा पाटील व कार्यकर्ते सहभागी झाले होते.









