मध्यंतरी पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली. हनीट्रॅपच्या सापळ्यात सापडून अतिशय संवेदनशील व गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. आज त्या संचालकांची पुढील चौकशी होईल त्यातून काही बाबी स्पष्ट होतीलही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आज तारखेला विविध सायबर गुह्यांचा वापर सामान्य नागरिकांना फसवण्यासाठी नुसता होत नसून, देशाच्या संरक्षणाला याचा धोका पोहचविला जात आहे. त्यामुळे सध्या हा हनीट्रॅपचा विषय ऐरणीवर आला आहे. हे वाढू नये म्हणून समाजामध्ये जागरुकता वाढविणे हे अतिशय आवश्यक आहे. डिजिटायझेशनचा उपयोग आज सर्वजणच करत आहेत. त्याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार देशाविरुद्ध विविध टूल्स वापरत आहेत. आज डीआरडीओचे संचालक या हनीट्रॅपच्या जाळ्यामध्ये अडकले. जर सतर्कता बाळगली नाही तर भविष्यात आणखीन काही वेगळी टुल्स वापरून देशाच्या संरक्षणाला धोका पोहचविला जाऊ शकतो. बऱ्याचवेळा अशा प्रकारच्या गुन्ह्याला बळी पडणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती कारणीभूत असते.
विशेष करुन ज्यांचे वय साधारण 50-55च्या पुढे असते व जे एकटे असतात असे लोक या हनीट्रॅपमध्ये अडकतात. कुठेतरी मानसिक आधार मिळावा या आशेने सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीला रिक्वेस्ट पाठवणे किंवा हे गुन्हेगार अशा लोकांना रिक्वेस्ट पाठवून मैत्री वाढवतात आणि हळूहळू त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी गोड बोलून आपला फायदा करून घेतात. बऱ्याच वेळेला समोरची व्यक्ती ही महिला नसून एखादा पुरुष असू शकतो. हे आपल्या अकाउंटला एका सुंदर महिलेचा फोटो वापरून अशा लोकांना जाळ्यामध्ये अडकवले जाते. बऱ्याचदा उच्चपदावर नोकरी करणाऱ्या व्यक्तीला काम करण्यासाठी ऑफिसने लॅपटॉप, मोबाईल पुरविलेला असतो. कामाकरता ह्याच लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर सोशल मीडिया साईट्स उघडल्या जातात. अशा वेळेला ज्या ऑटोमॅटिक सिस्टिम्स आहेत ज्याला पेलोड सिस्टिम्स असे म्हणतात ते काम करत असतात व आपल्या संगणकाची माहिती गोळा करत असतात.
जर आपल्या ऑफिसच्या संगणकावर आपण अशा पद्धतीच्या साईट्स ओपन केल्या, विशेष करून चॅटिंग साईट्स तर आपल्या संगणकातील माहिती पलीकडे जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडिया किंवा तत्सम चॅटिंग साईट्स आपल्या ऑफिसच्या लॅपटॉपवर अजिबात उघडू नयेत. सोशल मीडियावर ज्याचा प्रोफाईल स्ट्रॉंग आहे तो तरुण किंवा तरुणी बहुदा ह्यांचे टार्गेट बनत आहेत. प्रत्यक्षात थोडे असताना जास्त दाख़वण्याच्या मोठेपणाची हौस असणारेही ह्यामध्ये फसले जात आहेत. सुरवातीला पोस्ट लाईक करणे मग कॉमेंट करणे या बाबीही हनी ट्रॅपला कारणीभूत ठरत आहेत. तसेच काहीजणांना ठरवून ह्यामध्ये अडकवले जाते. त्यासाठी हे गुन्हेगार सोशल मीडिया प्रोफाईल शोधतात. टाईमलाईनवर कशा पोस्ट आहेत, कोणते फोटो आहेत याचा अभ्यास करतात. आपला एक खोटा अकाऊंट तयार करतात. स्वत:ची जुजबी माहिती प्रोफाईलमध्ये भरतात. एक देखणा फोटो प्रोफाईलला लावतात. हे सर्व झाले की त्या विशिष्ट व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितात. तोही कुतूहल म्हणून त्याला प्रतिसाद दिला, की मग गोड बोलून जवळीक साधण्यास सुरूवात होते मग तुम्ही केलेल्या सेक्स चॅटचा, तर कधी पाठवलेल्या न्यूड फोटोंच्या बदल्यात खंडणी मागितली जाते. स्त्रिया आणि पुरुष दोघेही ह्या हनीट्रॅपला बळी पडतात, तर बहुतेक प्रकरणांमध्ये, महिला ह्या अपराधी तर पुरुष हे पीडित असतात. हनीट्रॅपचा धोका सर्व वयोगटातील लोकांना आहे.
साधारण चाळीशीतील किंवा विधवा स्त्रिया किंवा एकटेपणा जाणवणारे आणि महिला साथीदार शोधत असलेले मध्यमवयीन पुरुष हे देखील या हनीट्रॅपचे बळी ठरलेले आढळतील.
फेसबुकपाठोपाठ इन्स्टन्ट मेसेजिंग अॅपवरुन आता ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. एकदा कुणी जाळ्यात सापडला की त्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. असं काही तुमच्याबाबतीत घडल्यास न लाजता तातडीनं तक्रार करा. ह्यासर्व बाबतीत आपण सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. आपण कोणा, कोणाला ऑनलाईन भेटतो म्हणजे कोणाला मेसेज करतो याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीचे मेसेज आहेत का? ज्या व्यक्तीबरोबर आपण चॅटिंग करतो आहोत ती व्यक्ती आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
थोडक्यात अज्ञात लोकांशी मैत्री करु नका. शक्यतो नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करू नका. आपले चॅट रेकॉर्ड होऊ शकतात किंवा जर फोटोची मागणी झाली व आपण ते पाठविले तर ते फोटो मॉर्फ करून त्याचे नग्न फोटोमध्ये रुपांतर करुन ब्लॅकमेल केले जाऊ शकते. सायबर गुन्हेगारांच्या धमक्यांना घाबरुन कोणत्याही मागण्या मान्य करुन पैसे देऊ नका. असे घडल्यास त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा किंवा प्ttज्s//म्ब्ंाrम्rग्स.gदन्.ग्ह ह्या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंद करा.
-विनायक राजाध्यक्ष








