सांगली प्रतिनिधी
वाढते खाजगीकरण हे धोकादायक आहे, सामान्यांचा विकास करायचा असेल तर सहकार क्षेत्राला पुन्हा एकदा उर्जीत अवस्थेत आणण्याचं काम सहकारातील कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. तरुण भारत स्टेडियमवर आयोजित सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “सहकार चळवळीत अतिशय स्वच्छ काम करून सहकाराला ताकद देण्याचे काम गुलाबराव पाटील यांनी केलं. वसंतदादापासून सांगलीतून राज्यभर अनेकांनी सहकार चळवळीला नेते दिले. गुलाबराव पाटील यांनी राज्यबँकेचे काम अत्यंत तळमळीने केले, त्यामुळे सहकार राज्यभर मजबूत झाला.”
यावेळी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे, पालकमंत्री सुरेश खाडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. विश्वजित कदम, विद्याधर अनास्कर, आमदार मोहनराव कदम, मानसिंगराव नाईक, अरुण लाड, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, जयश्री पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.