प्रतिनिधी /पणजी
राज्यात ड्रग्ज व्यवसाय दरवर्षी वाढत असून या व्यवसायात स्थानिक युवकांचा सहभागही मोठय़ाप्रमाणात वाढत असल्याने चितेंची बाब बनली आहे. गेल्या सहा वर्षात ड्रग्ज प्रकरणात 126 स्थानिक युवकांना अटक झाली आहे. झाटपट पैसा मिळविण्याच्या नादात युवावर्ग या बेकायदीर व्यवसायाकडे वळत आहेत.
गेल्या सहा वर्षात 126 जणांना अटक झाली असली तरी पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून या व्यवसायात सक्रिय असलेले कितीतरी स्थानिक युवक आहेत. अनेक युवक व्यवसाय करीत असताना कधी ड्रग्ज नशेच्या आहारी जातात आणि नंतर त्यातच जीवन संपवतात हा सर्वप्रकार म्हणजे मोठी चिंतेची बाब बनली आहे.
- वर्ष अटक
- 2022 45
- 2021 22
- 2020 39
- 2019 3
- 2018 8
- 2017 9
गोवा वेल्हा येथे स्थानिक युवकास अटक
रविवारी रात्री गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गोवा वेल्हा येथे केलेल्या कारवाईत एका स्थानिक युवकाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे 2 लाख 10 हजार रुपये किमंतीचा गांजा जप्त केला आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. त्याला आज मंगळवारी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संशयिताचे नाव क्लीसमॉन फ्रान्सिस पेरीस (20, शिरदोण बांबोळी) असे आहे. संशयित ड्रग्ज विक्री करण्यासाठी गोवा वेल्हा येथील ‘पापास बार ऍण्ड रेस्टॉरंट’च्या मागे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून संशयिताला शिताफीने रंगेहाथ अटक केली. संशयिताकडील डीओ स्कूटरमध्ये 2 कि 6 ग्रॅम गांजा सापडला असून गांजासह स्कूटर जप्त करण्यात आली आहे. सीआयडी निरीक्षक लक्षी आमोणकर व त्यांच्या टीमने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरु आहे.









