ग्राहकांची गैरसोय, सेवा सुधारण्याची मागणी
बेळगाव : हेस्कॉमने बिल भरणा सेंटर (एटीपी) बंद केल्यामुळे नागरिकांना ऑनलाईन वीज बिल भरावे लागत आहे. परंतु हेस्कॉमच्या वेबसाईटवर वीज बिल भरल्यानंतर मध्येच सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बिल भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे हेस्कॉमने सर्व्हरमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. वीज बिल भरण्यासाठी हेस्कॉमकडून शहरामध्ये एटीपी सेंटर सुरु करण्यात आले होते. शहापूर, रेल्वे स्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालय, नेहरुनगर येथील कार्यालय, गोवावेस, खासबाग, खंजर गल्ली यासह इतर भागांमध्ये एटीपी सेंटर सुरु होते. मार्च 2025 मध्ये एटीपी चालविणाऱ्या कंपनीचा करार संपुष्टात आला. त्यानंतर हेस्कॉमच्या बिल भरणा पेंद्रांवरच नागरिकांना अवलंबून रहावे लागले. यासाठी हेस्कॉमची वेबसाईट तसेच गुगल पे, फोन पे यासारख्या ऑनलाईन सेवांद्वारे बिल भरण्याची सूचना केली आहे. हेस्कॉमच्या वेबसाईटवरून बिल भरणाऱ्या ग्राहकांना सर्व्हरच्या तक्रारी सतावत आहेत. बऱ्याचवेळा बिल भरताना मध्येच सर्व्हर डाऊन झाल्याने पेज आहे तिथेच थांबते. काहीवेळा पुन्हा नव्याने बिल भरण्याची सूचना वेबसाईटवर केली जात आहे. त्यामुळे किमान चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांमध्ये केली जात आहे.









