अध्याय अठ्ठाविसावा
अहंकारामुळे माणसाचा घात होतो असं सांगितल्यावर उद्धवाने विचारले मग ह्या अहंकारालाच बांधून ठेवले तर माणसाचा आत्मा त्याच्या देहातून मुक्त होईल आणि त्याचा जन्ममरणाच्या चक्रात अडकण्याचा प्रश्नच मिटेल, तेव्हा असं करता येईल का? देव म्हणाले, अरे हे इतकं सोपं नाही कारण इथं मायेचा नियंता असलेला ईश्वरच मायेच्या प्रभावाने वेढला जातो आणि त्यातूनच अहंकाराचा जन्म होतो. ईश्वरी अंश असलेला आत्मा जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याच्यात कोणकोणते बदल होतात ते तुला समजावून सांगतो. जेव्हा तो शरीरात आत्म्याच्या रूपाने प्रवेश करतो तेव्हा तो अविद्येने वेढला जातो म्हणून त्याला जीवात्मा असे म्हणतात. शरीरात प्रवेश केल्यावर आत्मा आपण ईश्वरी अंश आहोत हे विसरतो. ह्यामुळे त्याला शरीर हेच माझे अस्तित्व आहे असे वाटू लागते. आपला देह कायम सुखात राह्यला पाहिजे असे वाटून त्याला देहाच्या सुखाचा ध्यास लागतो. मनाच्या रूपाने तो निरनिराळे संकल्पविकल्प करून देहाला सुख मिळवून द्यायची जबाबदारी आपलीच आहे असे समजतो. समोर दिसणारा सर्व संसार ही त्याचीच रूपे आहेत असे म्हंटलेस तरी चालेल. ह्या गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती हीही तो स्वत:च होतो. त्यातूनच उत्पत्तीस्थिती-प्रलय हेही तोच घडवून आणतो. म्हणून काळ हे त्याचेच रूप होय. ब्रह्माला झालेल्या अहं ब्रह्मास्मि ह्या स्फूर्तीतून ईश्वराच्या लीलेमुळे संसार साकार झाला. संसारात दिसायला विविधता असली तरी हा सर्व भास असल्याने विश्वेश्वर, विश्वमूर्ती असा तो एकटाच आहे. हे ओळखून त्याच्याशिवाय वेगळा असा कोणताच पदार्थ नाही हे जो ओळखेल तो धन्य होय. वेदही हेच सांगतात. असं जरी असलं तरी माणसाचा जीव मात्र निरनिराळ्या कल्पना लढवत बसतो आणि त्यांचीच भूल त्याला पडते. देहाला सुखात ठेवायचा त्याला ध्यास लागल्यामुळे त्याचा अहंकार म्हणजे मी कर्ता आहे ही भावना दिवसेंदिवस वाढीसच लागते. पुढे त्यांची एव्हढी मजल जाते की, देव कुठे नजरेला दिसत नाही मग तो खरा कशावरून असे त्याला वाटू लागते. ईश्वर आणि आपण वेगळे आहोत असे मानून तो आणखीन आणखीन अज्ञानाने वेढला जातो. त्याप्रमाणात त्याचा देहाभिमान वाढीस लागतो. हा देहाभिमान हेच त्याच्या बद्धतेचे कारण होते. खरं म्हणजे मनुष्य हा एक कठपुतळी सारखा आहे. त्याचे सर्व भले बुरे हे नियतीच्या इच्छेवर अवलंबून आहे पण हे काहीही लक्षात न घेता मीच काय तो माझे भले घडवून आणणारा आहे अशी खात्री वाटून तो स्वत:ला कर्ता समजतो. त्यामुळेच त्याला देहाभिमान होऊ लागतो परंतु हा देहाभिमान काहीच कामाचा नसतो. त्यामुळे तो समूळ मिथ्या होय. ह्या देहाभिमानामुळे मिथ्या असलेला संसार खरा वाटू लागतो. ह्या देहाभिमानाची पाळेमुळे खोलवर रुजलेली असतात आणि तो शेतात वाढलेल्या हरळीसारखा फोफावलेला असतो. त्यापासून मुक्तता मिळवणं अति कठीण असलं तरी जर निर्धाराने ठरवलं तर ते अशक्य नाही. अहंकाराचे निर्दालन कसे करायचे ते मी तुला सविस्तर सांगतो. मी आणि देव वेगळे आहेत असे जीवात्मा समजू लागला की त्याला काया, वाचा, मनाने द्वैताचे स्फुरण होते. त्याचे निर्मुलन करणं आवश्यक आहे. जीवात्म्याला वाटू लागलेल्या भेदामुळेच त्याला संसार खरा वाटू लागतो. जीवात्म्याहून संसार भिन्न आहे असे म्हणणे हेच मुळी अज्ञान आहे कारण वर सांगितल्याप्रमाणे तो त्रिगुणांनी वेढलेला असतो. संसार हाही त्रिगुणयुक्त आहे. त्यामुळे जीवात्मा संसाराशी एकरूप झालेला असतो आणि त्याची संसाराशी झालेली एकरूपताच त्याचा देहाभिमान वाढवत असते. त्या देहाभिमानामुळेच कर्माकर्मांच्या आटाटी होऊन जन्ममरणांचे कोटी कोटी फेरे घेणारा जीव दु:ख संकटे भोगत असतो.
क्रमश:








