कुकी समुदायाचा विरोध : इंटरनेटवरील बंदी 26 ऑक्टोबरपर्यंत
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या सीमावर्ती भागांमध्ये पोलीस कमांडोंची संख्या वाढविण्यात आली आहे. याच्या विरोधात म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मोरेह शहरात एका समुदायाच्या महिलांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. कुकी इंपी आणि कमिटी ऑन ट्रायबल युनिटी या संघटनांनी शहरात इंफाळ खोऱ्यापेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात येत असल्याने शांतता भंग होऊ शकते असा दावा केला आहे. तर राज्यात हिंसेच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटवरील बंदी 26 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
शहराच्या बफर झोनमध्ये निमलष्करी दलाचे जवान आणि सैनिक मोठ्या संख्येत तैनात आहेत. तरीही कुकीबहुल शहर मोरेहमध्ये रात्री हेलिकॉप्टरद्वारे अतिरिक्त मैतेई पोलिसांना तैनात करण्यात येत असल्याचा दावा कुकी इंपी संघटनेने केला आहे.
इंफाळ पूर्व जिल्ह्यात अलिकडच्या मोहिमांमध्ये शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा हस्तगत करण्याची कारवाई ही कुकी समुदायाला बदनाम करण्यासाठी करण्यात आली असून याचमुळे आम्ही निदर्शने करत असेही या संघटनेकडून म्हटले गेले आहे. आसाम रायफल्सचे कमांडेंट आणि अन्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी काही दिवसांमध्ये निदर्शकांसोबत अनेकवेळा चर्चा केली, परंतु अद्याप कुठलाच तोडगा निघालेला नसल्याचे सैन्याधिकाऱ्यांचे सांगणे आहे.
आदेशाविरोधात दाद मागण्याची अनुमती
मणिपूर उच्च न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी राज्यातील आदिवासी संघटनांना 27 मार्च रोजीच्या आदेशाच्या विरोधात दाद मागण्याची अनुमती दिली होती. 27 मार्च रोजीच्या आदेशात मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची शिफारस राज्य सरकारने करावी असे नमूद होते.
मणिपूरमध्ये आतापर्यंत 180 बळी
मणिपूरमध्ये मागील 4 महिन्यांपासून असलेल्या हिंसेत आतापर्यंत 180 हून अधिक जण मारले गेले आहेत. तर 1100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. याचबरोबर जाळपोळीच्या 5172 घटना नोंद झाल्या आहेत. मणिपूरमध्ये आतापर्यंत 65 हजारांहून अधिक लोकांना स्थलांतर करावे लागणार आहे.