भारताच्या कडक पवित्र्यानंतर नरमाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, लंडन
खलिस्तानी समर्थकांनी ब्रिटनमधील भारतीय दुतावासाबाहेर दोन दिवसांपूर्वीच घातलेल्या गोंधळानंतर तेथील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. भारताने याप्रकरणी कडक पवित्रा घेतल्यानंतर ब्रिटन प्रशासनाने सुरक्षेत वाढ केली आहे. अलीकडेच खलिस्तानी समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या घटनेचा निषेध करताना भारताने नाराजी व्यक्त केली होती.
खलिस्तानी समर्थकांनी उच्चायुक्त कार्यालयाबाहेर फडकवलेला तिरंगा खाली खेचण्याचा प्रयत्न केला होता. भारताने याप्रकरणी दिल्लीतील वरिष्ठ ब्रिटीश राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावून स्पष्टीकरण मागितले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भारतीयांनीही लंडनमध्ये एकत्र येऊन निदर्शने केली. भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमलेल्या भारतीय नागरिकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. तसेच ‘जय हो’ या गाण्याच्या संगीतावर ताल धरलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
ब्रिटिश उच्चायुक्तांच्या सुरक्षा कपातीची चर्चा
ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्झांडर एलिस यांच्या घराबाहेर लावलेले बॅरिकेड्स बुधवारी हटवण्यात आले. वास्तविक, सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा बॅरिकेड्स आणि पिकेट्स हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर तैनात करण्यात आलेली सुरक्षा कमी केल्याची चर्चा प्रसारमाध्यमांवर सुरू असली तरी संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार राजनैतिक प्रतिकारशक्ती कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्ली पोलिसांनी बुधवारी ब्रिटिश उच्चायुक्तालयासमोरील अतिरिक्त बॅरिकेड्स हटवले. ब्रिटन उच्चायुक्तालयाकडे जाणाऱ्या मार्गावर अतिरिक्त बॅरिकेड्समुळे समस्या निर्माण होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षेत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे ब्रिटिश उच्चायुक्तांनी सांगितले. हा सुरक्षेचा मुद्दा असून आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानी निदर्शनाच्या एका दिवसानंतर पोलिसांची ही कारवाई केल्याने सुरक्षा कपातीची चर्चा सुरू झाली होती.









