आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जोरदार चर्चा : उपमहापौर कोण होणार? याकडे शहरवासियांचे लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
महापौर-उपमहापौर निवड प्रक्रिया तब्बल सव्वावर्षानंतर होत असून दि. 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. सध्या निर्माण झालेल्या उपमहापौर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे उपमहापौर पद चर्चेत आले आहे. प्रथम नागरिक म्हणून प्रतिष्ठा असलेल्या महापौर पदापेक्षा उपमहापौर पदाच्या चर्चेमुळे या पदाची प्रतिष्ठा वाढली आहे.
महापौर पद सामान्य महिलेसाठी राखीव आहे तर उपमहापौर पद ओबीसी ‘ब’ महिलेकरिता राखीव आहे. सध्या महापालिकेत भाजपचे संख्याबळ 35 असल्याने बहुमत प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजपचे महापौर-उपमहापौर होणार अशी चर्चा आहे. मात्र यामध्येदेखील महापौर पदासाठी 3 महिला इच्छूक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. उपमहापौर पद ओबीसी ‘ब’ महिलेकरिता राखीव असल्याने सध्या या आरक्षणानुसार नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या नगरसेविकेने उपमहापौर पदासाठी प्रयत्न चालविले आहेत.
ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अन्य नगरसेविकांनी प्रयत्न चालविले आहेत. हे प्रमाणपत्र मिळविताना बनावट कागदपत्रे किंवा खोटी माहिती देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र देताना शासनाने व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रमाणपत्र देण्यापूर्वी आयकर खात्याकडून ना हरकत दाखला घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन प्रादेशिक आयुक्त व जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शहरात उपमहापौर पदाच्या आरक्षणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. महापौर कोण होणार? यापेक्षा उपमहापौर कोण होणार? याबाबत चर्चेला ऊत आला आहे.
महापौर पद हे महत्त्वाचे असून प्रथम नागरिक म्हणून त्यांना मानसन्मान असतो. महापालिका सभागृहात महापौरांचा निर्णय हा अंतिम असतो. त्यामुळे हे पद प्रतिष्ठेचे मानले जाते. मात्र सध्या उपमहापौर आरक्षणामुळे जोरदार चर्चा सुरू असल्याने तसेच प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने उपमहापौर पदाची प्रतिष्ठा वाढली आहे. त्यामुळे उपमहापौर कोणत्या गटाचा आणि कोण होणार? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.









