रायगडमध्ये संशयास्पद बोट आढळल्यामुळे अलर्ट जारी
मालवण / प्रतिनिधी –
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी शुक्रवारी ८ वाजता संशयास्पद बोट आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सागरी जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरिहरेश्वर येथे वाहत आलेल्या स्पीड बोटमध्ये समुद्र किनारी ३ AK 47 आणि काही जिवंत राउंड सापडले आहेत तर दिघी येथील भरतखोल येथे फुगवलेला लाइफ तराफा सापडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव व मच्छीमार सहकारी संस्था तसेच नागरिकांनी सतर्क रहावे व काही माहिती मिळाल्यास किंवा संशयस्पद गोष्ट आढळल्यास तात्काळ सागरी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभाग सिंधुदुर्गने केले आहे.
दरम्यान जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. समुद्रकिनारच्या गावांमध्ये पोलिसांची गस्त दुपारपासून वाढली आहे. ठिकठिकाणी पोलीस, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.