सातारा तालुक्यातील दोघांचा पोहण्याचा प्रयत्न करताना बुडून मृत्यू
प्रतिनिधी/ सातारा
गवडी(ता. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन मुलांचा सारखळच्या तलावात बुडून मृत्यू झाला. स्वराज सतीश घोरपडे(वय 11) व सोहम संतोष घाडगे(वय 10, दोघे रा. गवडी पो. वेण्णानगर सातारा) अशी त्यांची नावे आहेत. पोहता येत नसतानाही तलावात पोहण्याचा प्रयत्न या मुलांच्या जीवावर बेतला आहे. गेल्या काही दिवसापासून पोहताना बुडून मृत्यू अशा घटना सातत्याने घडल्या आहेत. यामुळे काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
उन्हाळा म्हटले, की पोहणे हा लहान मुले ते अगदी जेष्ठ मंडळींचा आवडता कार्यक्रम असतो. शहरांमध्ये राहणारे लोक बहुतेकवेळी स्विमिंग पुल, किंवा सुट्टीवर गेल्यास तलाव, किंवा समुद्रामध्ये डुंबणे पसंत करतात, तर गावाकडे राहणाऱया लोकांना नदीमध्ये किंवा तलावामध्ये पोहण्याची मजा लुटता येते. पण या आनंदाला गालबोट लागते, ते कोणी तरी पोहोताना आकस्मात बुडून मृत्यू पावल्याच्या बातमीने. अशाच घटना गेल्या काही दिवसपासून शहरात व तालुक्यात घडत आहेत. गवडी(ता. सातारा) गावातील दोन मुले पोहता येत नसतानाही सारखळच्या तलावात पोहण्यासाठी गेली. तेव्हा त्यांचा बुडून मृत्यू झाला. परंतु ही पहिला घटना नाही. शाहूनगर मधील 18 वर्षाचा मुलगा विहिरीत पोहण्यासाठी गेला तेव्हा त्याचा बुडून मृत्यू झाला. आसगाव(ता. सातारा) येथेही पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. या वाढत्या घटना विचार करायला भाग पाडत आहेत. एप्रिल महिना सूरू असून पोहण्याकडे वाढता कल हा जीवघेणा ठरू नये म्हणून काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
ही घ्या काळजी
एखाद्या ठिकाणी पोहण्यासाठी उतरण्याआधी त्या ठिकाणाची माहिती करून घ्यावी. तेथील पाण्याचा प्रवाह कितपत वेगवान आहे, पाण्याचे ‘अंडर करंट‘ किती आणि कसे आहेत, पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचे धोकादायक जीव आहेत, किंवा नाही. इत्यादी गोष्टींची माहिती करून घेणे आवश्यक आहे. नदीमध्ये पोहोण्यासाठी उतरत असताना आपण कुठवर पोहत जाऊ शकतो हे पाहावे, आणि परतत असताना तीरावर येतानाचे मार्ग आधीच मनामध्ये आखून ठेवावेत.
सोबत ठेवा लाईफ जॅकेट
जर आपण पाण्यामध्ये खोलवर जाणार असू, तर आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत लाईफ जॅकेट किंवा कुठल्याही प्रकारचे फ्लोटेशन डिव्हाईस, म्हणजेच तुम्ही पोहोताना दमलात तर तुम्हाला पाण्यावर तरंगण्यासाठी सहायक ठरेल असे साधन, बरोबर नेले पाहिजे.
उंचावरून उडी मारण्याचे प्रयोग टाळावेत
पाण्यामध्ये शिरण्याआधी पाण्याच्या तापमानाचा अंदाज घेण्यास विसरू नका. स्विमिंग पुलस च्या मानाने नदी किंवा तलावातील पाण्याचे तापमान कमी असण्याची शक्यता असते. जर पाणी खूप थंड असेल, तर हातापायांना होणारा रक्तप्रवाह पोटाकडे वळविला जातो. त्यामुळे पोहोताना अचानक हातपाय शिथिल पडल्याची भावना होऊ शकते. तसेच उंच कडय़ावरून पाण्यामध्ये उडी मारण्याची कल्पना चित्रपटामध्ये किंवा जाहिरातींमध्ये बघताना चांगली वाटते, मात्र वास्तवामध्ये असले प्रयोग करणे आवर्जून टाळावे. पाण्यामध्ये शिरताना आधी पावले पाण्यामध्ये बुडवावीत आणि मग हळू हळू सर्व शरीर पाण्यामध्ये जाईल असे पाहावे. पोहण्यास उतरताना मद्यपान करणे आवर्जून टाळायला हवे. मद्याच्या धुंदीमुळे शरीराच्या क्रिया मंदावतात.









