कामगारही मिळत नसल्याने शेती व्यवसाय मोडकळीला येण्याची शेतकऱ्यांत भीती : युवा पिढीची शेतीकडे पाठ
वार्ताहर/उचगाव
शेती व्यवसाय करत असताना अलीकडच्या काळातील परिस्थिती पाहता खतांचे वाढलेले भरमसाठ दर, कीटकनाशक औषधांच्या न परवडणाऱ्या किमती आणि त्याच्यातच शेतीसाठी काम करणाऱ्यांसाठी न मिळणारा कामगार वर्ग यामुळे शेती व्यवसाय मोडकळीला येईल की काय? अशी भीती आता उरल्यासुरल्या शेतकरी कुटुंबामध्ये निर्माण झाली आहे. अलीकडच्या काळात पाहिले तर खताच्या भरमसाठ वाढलेल्या किमती या शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या नाहीत. इतकी महागडी खते घालून शेतातून पीक काढायचे आणि त्याला मार्केटमध्ये योग्य दर मिळेल की नाही याचीही शंका आहे. यामुळे मिळालेले उत्पादन हे खत, कीटकनाशक आणि कामगार यातच खर्च होत असल्याने काढलेल्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काय मिळते, हा मोठा यक्षप्रश्न आहे.
शेती करावी की करू नये, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मात्र याची शासनदरबारी कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. किंवा योजना आखल्या जात नाहीत. अनेकवेळा शेतीमध्ये भाजीपाल्याचे मोठे उत्पादन काढले जाते. मात्र त्याला बाजारात कवडीमोल दराने भाव मिळतो. याबरोबरच इतर पिकेही मोठ्या कष्टातून शेतकरी काबाडकष्ट करून काढत असतो आणि त्याला अखेर हवा तसा दर मिळत नाही. शेवटी हाच भाजीपाला फेकून देण्याची अथवा जनावरांना घालण्यासाठी याचा उपयोग करावा लागतो. आजची युवापिढी शेतीकडे वळत नाही. जी जुनी पिढी आहे हीच सध्या शेती करत असल्याने शेतातून पिके काढली जातात. याबरोबरच युवापिढी ना काम ना धंदा, ना शेती ना व्यवसाय अशा चक्रव्युहामध्ये अनेक गावातील युवक अडकल्याचेही दिसून येत आहे.
खते-कीटकनाशकांच्या किमती अल्पदरात देण्याची व्यवस्था करणे गरजेचे
शेतकऱ्यांनी शेतामध्ये राबराबून कष्ट करून पिके काढायची आणि ती कवडीमोल दराने विकायची अथवा जनावरांना घालायची, असे अनेकवेळा शेतकरी वर्गावर प्रसंग येत असतात. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना खताच्या किमती अल्पदरात तसेच कीटकनाशकेही सर्व अल्पदरात देण्याची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा शेती व्यवसाय पुढील काळात परवडणे कठीण असून शेती व्यवसाय मोडकळीला येईल, असे शेतकऱ्यांचे आता म्हणणे आहे.









